वेळू वीज उपकेंद्र रखडले, उद्योजकांचा संताप; ग्रामस्थ व ‘स्वराज्याचे शिलेदार’ संघटनेकडून महावितरण कार्यालयाला घेराव

खेड शिवापूर : वेळू (ता. भोर) परिसरातील अपुरा आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तसेच रखडलेले वीज उपकेंद्राचे काम या कारणांमुळे स्थानिक उद्योजक आणि नागरीक संतप्त झाले आहेत. अखेर सोमवारी (दि. २८ जुलै) सकाळी संतप्त नागरीक आणि उद्योजकांनी वेळू येथील महावितरण कार्यालयात धडक दिली व अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र उपकेंद्राचे काम नेमके कोठे आणि कशामुळे रखडले आहे, याची स्पष्ट माहिती खुद्द महावितरण अधिकाऱ्यांकडेच नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले.

वेळू आणि खेड शिवापूर परिसरात अनेक छोटे- मोठे उद्योग आणि कंपन्या कार्यरत असून गेल्या अनेक वर्षांपासून या भागात अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यामुळे उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी वेळू येथे नवीन वीज उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून, त्यासाठी दीड वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी जागाही उपलब्ध करून दिली आहे. मात्र, इतक्या काळानंतरही प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही.

Advertisement

या पार्श्वभूमीवर ‘स्वराज्याचे शिलेदार’ संघटना, स्थानिक उद्योजक आणि ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी महावितरण कार्यालयावर धडक दिली. उपकेंद्राचे काम का रखडले आहे, याबाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडे समाधानकारक उत्तरच नव्हते. या वेळी ग्रामस्थ प्रतिनिधी आणि महावितरणच्या कंत्राटदार असोसिएशनचे योगेश घोरपडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सद्यस्थिती स्पष्ट केली.

या आंदोलनावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमोल पांगारे, उद्योजक सतीश कुलकर्णी, स्वराज्याचे शिलेदार संघटनेचे राहुल पांगारे, अजिंक्य पांगारे, ॲड. संतोष शिंदे, गुलाबजी चोबे, गणेशजी वाडकर, योगेश घोरपडे, दत्तात्रय गोगावले, समीर गोगावले, उद्योजक संजयराजे भोसले, प्रमोद पाटील, किरण पाटील, कैलास गोगावले, सोनबा घुले आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page