बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारप्रमुखांच्या नावाची घोषणा; भोर, राजगडला कुलदीप कोंडे तर मुळशीमध्ये किरण दगडे यांची नियुक्ती

पुणे : निवडणूकीचा अर्ज दाखल केल्यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारप्रमुखांची आज रितसर घोषणा करण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या समितीत प्रदीप गारटकर, वासुदेव काळे व किरण गुजर या तिघांचा समावेश असून ही समिती पूर्ण मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असेल.

विधानसभा मतदारसंघनिहाय प्रचारप्रमुखपदी बारामतीत बाळासाहेब तावरे, इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडमध्ये आमदार राहुल कुल, पुरंदरमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे, खडकवासल्यामध्ये आमदार भीमराव तापकीर, भोर, राजगड मध्ये कुलदीप कोंडे व मुळशीमध्ये किरण दगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काही वेळातच या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना तर पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांना, दौंडमध्ये राहुल कुल व खडकवासला येथे भीमराव तापकीर यांना प्रचारप्रमुखपद देत राजकीय बॅलन्स साधण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याचे दिसते. तसेच शिवसेना शिंदे गटात कुलदीप कोंडे यांनी आज प्रवेश करताच त्यांच्यावरही लगेचच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

या निवडणूकीत महायुतीच्या सर्वच घटक पक्षांना सोबत घेऊन जाताना आज स्वताः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना अजित पवार यांच्या समवेत उपस्थित राहिले. महायुती मजबूत असून महायुतीत उत्तम समन्वय आहे हा संदेश राज्यभर या निमित्ताने या तिन्ही नेत्यांनी पोहोचविला असून आता कार्यकर्तेही जोमाने कामाला लागतील, अशी महायुतीची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page