खानापूरच्या विहिरीत अडकलेला मोर सुखरूप बाहेर; ग्रामस्थ, सर्पमित्र व वनविभागाची तत्परता
भोर : पुणे जिल्हा वन्य प्राणी व सर्प रक्षक असोसिएशन आणि वनविभाग भोर यांच्या संयुक्त प्रयत्नातून भोर तालुक्यातील खानापूर येथे विहिरीत पडलेल्या एका मोराची यशस्वी सुटका करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. २६ जुलै) सकाळच्या सुमारास घडली.
शेतकरी जयवंत थोपटे हे सकाळी आपल्या शेतातील विहिरीकडे गेले असता त्यांना विहिरीच्या पाण्यात एक मोर अडकलेला दिसला. त्यांनी तत्काळ वनविभाग भोर यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत व वनपाल सुग्रीव मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक के. एम. हिमोणे आणि श्रीमती पूनम माने घटनास्थळी दाखल झाले.
या वेळी सर्पमित्र अनिरुद्ध बर्वे, समीर कदम, अविनाश चव्हाण आणि किरण बरदाडे यांनी विहिरीत उतरून दोराच्या सहाय्याने मोराला सुखरूप बाहेर काढले. भोर येथे प्रथमिक उपचार झाल्यानंतर मोरास पुढील उपचारासाठी पिंगोरी येथील ‘इला फाउंडेशन’च्या ताब्यात देण्यात आले. वनविभाग, सर्पमित्र आणि ग्रामस्थांच्या तत्पर आणि योग्य समन्वयामुळे एक दुर्मिळ आणि मौल्यवान पक्षी वाचवण्यात यश मिळाले. या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.