कोल्हेवाडीत भरदिवसा तरुणाची सपासप वार करून निर्घृण हत्या
हवेली : सिंहगड रस्त्यावरील खडकवासला जवळील कोल्हेवाडीत बुधवारी (दि. २७ नोव्हेंबर) भरदुपारी सव्वाचारच्या सुमारास कोयत्याने वार करून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. हल्ल्यानंतर सर्व हल्लेखोर फरार झाले. या घटनेमुळे सिंहगड, खडकवासला परिसरात दहशत पसरली आहे. सतीश सुदाम थोपटे (वय ३८ वर्ष, सध्या रा. सुशीला पार्क, कोल्हेवाडी, खडकवासला; मूळ रा. खानापूर थोपटेवाडी, ता. हवेली) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या देखरेखीखाली हवेली पोलिस तपास करत आहेत.
सतीश थोपटे याचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील असा परिवार आहे. त्याच्याविरोधात हवेली पोलिस ठाण्यात यापूर्वी गोळीबाराचा गुन्हा दाखल आहे. सतीश हा सुशीला पार्कजवळील कोल्हेवाडी रस्त्यावर उभा असताना हातात धारदार कोयते घेऊन आलेल्या चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर जोरदार वार केले. त्यात तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात तो निपचीत पडला. स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले असता तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे म्हणाले की, मृत सतीश थोपटेच्या नावावर एकाने फ्लॅट घेण्यासाठी 25 लाख रुपयांचे कर्ज काढले होते. कर्जाचे हप्ते भरत नसल्याने सतीश हा त्या व्यक्तीला वारंवार फोन करत होता. त्यातून चिडून सतीश थोपटेच्या नावावर कर्ज काढणार्या व्यक्तीने साथीदारांच्या मदतीने कोयत्याने वार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
फरार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार संतोष तोडकर यांच्यासह पोलिस पथकाने परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. या घटनेमुळे कोल्हेवाडी, खडकवासला, किरकटवाडीसह परिसरात खळबळ उडाली. फरार हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून त्याबाबतची माहिती लवकरच जाहीर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.