पुणे जिल्ह्यात मनरेगातून ९३४ हेक्टरवर फळबाग लागवड; भोरमध्ये ६३.९५, वेल्ह्यात ३४.०५ तर मुळशीत ७०.१४ हेक्टरवर लागवड
पुणे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) पुणे जिल्ह्यात चालू वर्ष २०२३-२४ मध्ये ९३४ हेक्टरवर फळबाग लागवड पूर्ण झाली आहे. शेतकर्यांकडून प्रामुख्याने आंबा, डाळिंब, सीताफळ, लिंबू, पेरू आदी फळपिकांच्या लागवडीकडे कल असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.
शेतकर्यांना स्वतःच्या शेतावर फळबाग लागवडीद्वारे रोजगारनिर्मिती करून आर्थिक स्तर उंचाविणे, फळपिकांखालील क्षेत्र वाढवून शेतीपूरक व्यवसायात वाढ करून उत्पादन व उत्पन्न वाढविणे हा मनरेगातून फळबाग लागवड योजनेचा मुख्य उद्देश आहे. योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर, शेताच्या बांधावर, पडीक शेतजमिनीवर फळबाग लागवड केली जाते. त्यातून जमिनीची धूप कमी होऊन पर्यावरणाचा समतोलही राखण्यास मदत होत होते.
आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, लिंबू, सीताफळ, बोर, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, सुपारी या फळपिकांची कलमे-रोपे तसेच नारळासह बांबू, करंज, सांग, शेवगा, कवठ, बांबूची लागवड करता येते. शेतकर्यांकडील पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेनुसार त्या त्या तालुक्यांमधील योजनेतील सहभाग अवलंबून राहण्याची अपेक्षा आहे. कारण, यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे एकूण फळबाग लागवडीस मर्यादा येण्याची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
मनरेगातून जिल्ह्यात झालेली फळबाग लागवड हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे : भोर ६३.९५, वेल्हा ३४.०५, मुळशी ७०.१४, मावळ ६४.८५, हवेली १४.८५, खेड ५१.३१, आंबेगाव १५७.५०, जुन्नर १०९, शिरूर ६७.४७, बारामती २६.५०, इंदापूर ८०.६०, दौंड १२६, पुरंदर ६८.४० मिळून ९३४ हेक्टरवर फळबाग लागवड पूर्ण झाली आहे. दरम्यान, मनरेगातून फळपीकनिहाय किती क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली, याची आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू आहे