नसरापूर येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापुर येथे राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. राजेंद्र सुरेश हाडके (वय ३२ वर्ष, रा. शेटे आळी,नसरापुर. ता. भोर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी(दि. १ एप्रिल) सायंकाळी ६:३० वाजता उघडकीस आली.
राजगड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राजेंद्र हाडके हे त्यांची पत्नी कोमल हाडके(वय २२ वर्ष) यांच्यासहित नसरापूर येथील शेटे आळी येथे रहावयास आहेत. सोमवारी(दि. १ एप्रिल) दुपारी ४:३० वाजता कोमल या भाजी मंडई येथे बाजार आणायला गेल्या असता बाजार करत असताना त्यांचे पती राजेंद्र हे कोमल यांना भेटले व बोलले “मी घरी जातो तू भाजीपाला घेऊन घरी ये”, यानंतर बाजार आटोपून कोमल या शेटे आळी येथील राहत्या घरी गेल्या असता त्यांना पती राजेंद्र हे घरातील तुळइच्या पाईपला नायलॉन दोरीने गळफास घेऊन मयतस्थितीत लटकत असल्याचे दिसून आले. त्यांच्या आवाजाने शेजारील लोक गोळा झाले. त्यांनी लगेच या घटनेची माहिती राजगड पोलिसांना दिली. माहिती मिळताच राजगड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन भोर येथील उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. राजेंद्र यांनी केलेल्या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार कोंढाळकर करीत आहेत.