भोर-वेल्हा-मुळशी व खडकवासला या विधानसभा मतदारसंघांतील आदिवासी कातकरी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम
भोर : भोर-वेल्हा-मुळशी व खडकवासला या दोन विधानसभा मतदारसंघांतील आदिवासी कातकरी नागरिकांची मतदार नोंदणी करुन घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिली आहे.
फेरीवाले, तृतीय पंथीय, वीटभट्टी कामगार, ऊसतोड मजूर, भटक्या विमुक्त जाती-जमाती अशा सर्वांची मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. खडकवासला, एनडीए दहा नंबर गेट, गोऱ्हे बुद्रुक,डोणजे, वरदाडे,आगळंबे, बहुली, कुरण खुर्द (वेल्हे) कोंढूर (मुळशी) व पानशेत परिसरातील डोंगराळ भागात राहणारे आदिवासी कातकरी समाजातील काही अपवाद वगळता शेकडो नागरिक मात्र मतदानाच्या हक्कापासून वंचित आहेत.
याबाबत डॉ राजेश देशमुख यांनी या सर्व गावांमध्ये विशेष मोहीम राबवून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांची मतदार नोंदणी करुन घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. याबाबत सूचना देण्यात आल्या असून खडकवासला व भोर-वेल्हा-मुळशी या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील आदिवासी कातकरी नागरिकांची मतदार नोंदणी करुन घेण्यासाठी वस्त्यांवर जाऊन विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिली आहे.