वेल्ह्यामधील तोरणा खोर्यातील आरोग्य सेवा ठप्प ; शिपाईच करत होते डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार, प्रशासनाचे दुर्लक्ष
वेल्हा : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वेल्हे तालुक्यातील तोरणा खोर्यातील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. गडाच्या पायथ्याला असलेल्या पासली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाईच डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करीत होते. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. रुग्णांना वार्यावर सोडणार्या कामचुकार डॉक्टर, कर्मचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पासली आरोग्य केंद्रात एकच डॉक्टर आहेत. ते रविवारी (दि. ३ डिसेंबर) त्यांच्या गावी गेले. त्यामुळे आरोग्य केंद्रात डॉक्टर नाही. नियुक्तीस असलेल्या परिचिरिका, कर्मचारीही गायब झाले आहेत. सोमवारी (दि. ४ डिसेंबर) सकाळपासून आरोग्य केंद्रात एक शिपाई होता.
रायगड जिल्ह्यालगतच्या केळद, कुंबळे, कुसार पेठ, भोर्डी आदी भागांतून पायपीट करून आलेले महिला, मुले, वृद्ध रुग्ण आरोग्य केंद्रात उपचारासाठी ताटकळत बसून होते. जवळपास वीस ते पंचवीस रुग्ण आवारात डॉक्टरांची प्रतीक्षा करीत होते. या गंभीर प्रकाराची माहिती स्थानिकांनी वेल्हे पंचायत समितीच्या आरोग्य विभागाला दिली. त्यानंतर वेल्हे येथून एक परिचारिका सकाळी अकरा वाजता आरोग्य केंद्रात दाखल झाल्या. याबाबत वेल्हे तालुका पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. जयदीपकुमार कापशीकर म्हणाले, की पासली आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी रविवारी गावी निघून गेल्यामुळे आरोग्य केंद्रात डॉक्टर नव्हते. त्यामुळे आंबवणे आरोग्य पथकाच्या डॉक्टरांना पासली केंद्रात पाठविण्यात आले. आरोग्य केंद्रात दुसरा वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. ते लवकरच रुजू होतील. आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर, कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.