शाळकरी मुलींसमवेत अश्लील कृत्य करणार्या वासनांध शिक्षकाला ३ वर्षांचा कारावास
हडपसर : शाळकरी मुलींशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी न्यायालयाने कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या रामेश्वर विलास राठोड (वय ३५, रा. खराडी) या शिक्षकाला ३ वर्षे साधा कारावास आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी याविषयीचे आदेश दिले आहेत. दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. ही घटना हडपसर भागातील एका नामांकित शाळेत घडली होती.
स्नेहसंमेलनासाठी नृत्य शिकवण्याच्या बहाण्याने राठोडने सहावीत शिकणार्या मुलींना मोबाईलवर अश्लील चित्रफीत दाखवली होती, तसेच या प्रकाराची माहिती कुणाला न देण्याविषयी धमकावले होते, अशी तक्रार मुलींनी केली होती. या प्रकाराची माहिती शाळेतील शिक्षकांना देण्यात आली होती. त्यानंतर याविषयी ‘मुस्कान’ या स्वयंसेवी संस्थेला कळवण्यात आले. या प्रकरणी राठोडविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. अधिवक्ता वाडेकर यांनी एका मुलीचा नोंदवलेला जबाब, तिचे पालक, एक विद्यार्थी, त्याचे पालक, २ स्वयंसेवी आणि अन्वेषण अधिकारी यांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने राठोडला शिक्षा सुनावली आहे.