शरीर सौष्ठव स्पर्धा पाहण्यासाठी निघालेल्या तरुणाचा भोर-कापूरहोळ रोडवर अपघातात मृत्यू; डंपर चालकावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कापूरहोळ : नसरापूर (ता. भोर) येथे आयोजित करण्यात आलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धा पाहण्यासाठी निघालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा भोर-कापूरहोळ रोडवर डंपरने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १९ जानेवारी) सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली. अमोल दगडु दुरकर (वय २६ वर्ष, सध्या रा. भोलावडे ता. भोर, मुळ रा.साळुंगन ता. भोर) असे अपघातात मयत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अनंता एकनाथ दुरकर (वय ३६ वर्ष, सध्या रा. गणेशनगर तळवडे पुणे, मुळ रा.साळुंगन ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालक ज्ञानेश्वर गुलाब बाबर (रा. वीर, ता.पुरंदर) याच्यावर गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अमोल दुरकर हा रविवारी सायंकाळी सात वाजता भोरहून कापूरहोळच्या दिशेने मोटारसायकल (एम. एच. १२ पी. जे. ४९८४) वरून निघाला होता. साडे सात वाजण्याच्या सुमारास अमोल हा कापूरहोळ (ता. भोर) गावच्या हद्दीतील बारामती अग्रो लिमिटेड रोहन डेअरी फार्म जवळून जात असताना अचानक समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने रोडवरून उजव्या बाजूस वळण घेतले. यावेळी मोटारसायकलवर असणाऱ्या अमोलला या डंपरची जोरदार धडक बसली. या धडकेत अमोलचा जागीच मृत्यू झाला. यांनतर राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डंपर चालक ज्ञानेश्वर गुलाब बाबर याच्यावर रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करत भरधाव डंपर चालवून अमोल दूरकर याच्या मृत्यूस कारणीभूत असल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार राहुल कोल्हे करीत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page