कोंढणपूर फाट्यावरील एटीएम मध्ये ज्येष्ठाला लुटले; राजगड पोलिसांनी लगेचच नाकाबंदी करत टोल नाक्यावर चोरट्यांना पकडले परंतु आरोपी मात्र आंतरराज्य सराईत गुन्हेगार निघाले
खेड शिवापूर : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून चार अनोळखी आरोपींनी त्यांच्या खिशातील २ हजार रुपये घेऊन नंतर पिन नंबरसह एटीएम कार्ड हस्तगत करून त्यांच्या खात्यावरून ५० हजार रुपये काढून लुट केल्याची घटना शुक्रवारी (दि. १७ जानेवारी) सकाळी साडेअकरा वाजता कोंढणपूर (ता. हवेली) फाट्यावरील ॲक्सिस बॅंक एटीएममध्ये घडली होती. याबाबत माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करत चारपैकी तीन आरोपींना ताब्यात घेतले. याबाबत राजगड पोलिस ठाण्यात माधवराव सखाराम जललवाड (वय ५६, मूळ रा. मंगरूळ, ता. हिमायतनगर, जि. नांदेड; सध्या रा. निवांत बंगलो, ऑर्चिड रिसॉर्ट, केळवडे, ता. भोर) यांनी फिर्याद दाखल केली. या आरोपींच्या ताब्यातून तब्बल १४७ एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आले आहेत. ही टोळी उत्तर प्रदेशातील असून त्यांच्यावर तब्बल २० वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास खेड शिवापूर कोंढणपूर फाटा येथील ॲक्सिस बँकेच्या एटीएममध्ये फिर्यादी जललवाड गेले होते. त्यावेळी एटीएम सेंटरच्या बाहेर उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्याच्या हातातील चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून २ हजार रुपये जबरीने काढून घेऊन, ‘एटीएम सेंटर में हमारे लोग है. उनको आप अपना एटीएम पिन नंबर बताओ, अगर आपने ऐसा नहीं किया तो आपको हम जान से मार देंगे,’ अशी दमदाटी केली. त्यामुळे त्यांनी एटीएममध्ये गेले. तेथे असलेल्या व्यक्तींनी त्यांना दमदाटी करत केलेल्या सुचनेनुसार एटीएमचा पिन नंबर त्यांच्यासमोर टाकुन अकाउंटवरून ५०० रुपये काढुन एटीएम कार्ड मशिनमध्ये ठेवुन घाबरून बाहेर गेले. नंतर कार्ड घेऊन आरोपी सिल्व्हर रंगाच्या दिल्ली पासिंग असलेल्या स्विफ्ट मोटारीमध्ये बसुन निघुन गेले व बाहेरील एटीएम सेंटरमध्ये कार्ड वापरून एकुण ५० हजार काढून घेतले.
याबाबत राजगड पोलिस ठाण्यात जललवाड यांनी माहिती देताच पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नाकेबंदी करण्यात आली. खेड शिवापूर टोल नाक्यावर पोलिस कर्मचारी तुषार खेंगरे, गणेश साळुंखे, पप्पू शिंदे, प्रमिला निकम यांनी यातील आरोपी समुन रमजान (वय ३६ वर्ष, रा. घागोट पालवन, रा. हरियाणा) नसिरुद्दीन नन्ने खान (वय ३० वर्ष) व बादशहा इस्लाम खान (वय २४ वर्ष, दोघेही रा. चिटा उर्फ चिरचिटा, बुलंद शहर, उत्तर प्रदेश) यांना थांबवले. पोलिस पाहून आरोपींनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. चौथा आरोपी आदील सगील खान (वय अंदाजे ३०, रा. चिटा उर्फ चिरचिटा, बुलंद शहर, उत्तर प्रदेश) हा पळुन गेला.
आरोपींची ही टोळी आंतरराज्य सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडील तपासात त्यांनी इतर राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले असून, अनेक पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. शनिवारी (दि. १८ जानेवारी) तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी दिली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित पाटील करत आहेत.