पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदार संघ निवडणुकीतील गैरप्रकारांवर २६४ पथकांकडून देखरेख
पुणे : लोकसभा निवडणुकीत उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर आणि निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी १३५ भरारी पथके आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथकांची स्थापन करण्यात आली आहे. खर्च संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अधिकारात जिल्हास्तरावर समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत.
प्रत्येक मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर खर्च पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे काम अन्य विविध पथकांच्या समन्वयाने चालते. भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी), माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी), जिल्हा नियंत्रण कक्ष, तक्रार संनियंत्रण कक्ष आदीदेखील खर्च पथकाला सहकार्य करतात. तसेच त्यासाठी आयकर विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचीदेखील या कामात मदत घेतली जाते.
जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघाअंतर्गत २१ विधानसभा मतदार संघात मिळून एकूण १३५ एफएसटी पथक आणि १२९ एसएसटी पथके स्थापन करण्यात आली आहेत. भोर मतदार संघात १५ आणि इतर २० मतदार संघात प्रत्येकी ६ एफएसटी स्थापन करण्यात आली आहेत. तसेच भोर विधानसभा मतदार संघात ९ आणि उर्वरित विधानसभा मतदार संघांमध्ये प्रत्येकी ६ एसएसटी स्थापन करण्यात आली आहेत.