बेकायदेशीर पार्सलच्या नावाखाली ओटीपी घेऊन पर्सनल लोन घेत घातला तब्बल ४० लाख ७० हजारांचा गंडा
मुळशी : बेकायदेशीर पार्सल आले असल्याचे सांगत बँक खात्याची गोपनीय माहिती घेत नागरिकांच्या परस्पर नावावर ४० लाख ७० हजार १९५ रुपयांचे कर्ज काढून घेत तरुणाची फसवणूक केल्याचे तीन प्रकार उघडकीस आले आहेत. या तिन्ही प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
पहिल्या प्रकरणात जुबेर दस्तगीर मुल्ला (वय २७, रा. बालेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईल क्रमांकधारक आणि स्काईप आयडीधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकरणात नागेश संभाजी हजारे (वय ४२, रा. माण, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन मोबाईल क्रमांकधारक आणि मुंबई एनसीबी विभाग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या प्रकरणात एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन मोबाईल क्रमांकधारक आणि स्काईप आयडीधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनोळखी व्यक्तीने फिर्यादी मुल्ला, हजारे आणि महिलेला फोन केला. तुमचे बेकायदेशीर पार्सल आले असून त्याबाबत तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे मुल्ला यांना फोनवरील व्यक्तीने सांगितले. त्यानंतर स्काईप आयडी देऊन फिर्यादींचे विश्वास संपादन करत आरोपीने त्यांच्याकडून ओटीपी घेतले. त्याआधारे मुल्ला यांच्या नावावर १६ लाख ७० हजार रुपयांचे, हजारे यांच्या नावावर १९ लाख ९४ हजार १०१ रुपयांचे तसेच महिलेच्या नावावर ४ लाख ६ हजार ९४ रुपयांचे असे एकूण ४० लाख ७० हजार १९५ रुपयांचे पर्सनल लोन घेत फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.