दादा-ताई एकाच मंचावर; सुप्रिया सुळेंची टीका अन् अजित पवारांचं प्रत्युत्तर, दोघांमध्ये वाक्-युद्ध
वारजे : पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्र. ३० मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पणाचे कार्यक्रम आज पार पाडले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार गटाच्या स्थानिक खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. यावेळी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीवरुन वाक्-युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले.
सदर कार्यक्रमात सुरुवातीला सुप्रिया सुळे यांचं भाषण झालं. यावेळी सुप्रिया सुळेंनी कित्येक दिवस याठिकाणी नगरसेवक नाहीय. अडीच वर्ष निवडणुका न झाल्यामुळे आज या भागातील सर्वसामान्य जनेतेने कोणाकडे जावं?, असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. तसेच सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं, असं स्वप्न आदरणीय यशंवतराव चव्हाण यांनी पाहिलं, त्या सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी नगरसेवकाची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे महापालिकेची निवडणूक आपण लवकरात लवकर घेतल्यास या भागातील लोकांना आधार मिळेल, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले.
सुप्रिया सुळेंच्या भाषणानंतर अजित पवार यांचं भाषण झालं. यावेळी सुप्रिया सुळेंच्या विधानावर अजित पवारांनी भाष्य केलं. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला. महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. पण निवडणुका या सुप्रिम कोर्टामुळे थांबलेल्या आहेत. आम्हाला ही वाटतं, आम्हीही लोकांमधून निवडून आलेले कार्यकर्ते आहोत, असं अजित पवार म्हणाले. सुप्रिम कोर्टामध्ये ओबीसीचा मुद्दा गेलेला आहे. त्यावर लवकरात लवकर तारीख लागावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करतंय, महापालिकेच्या निवडणुका लवकर व्हाव्या, या मताचं महायुतीचं सरकार आहे, असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलं.
दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात वैद्यकीय सुविधांचं महत्त्व लक्षात आलं. त्यामुळे गेली दोन वर्षे वैद्यकीय सुविधा वाढवण्यावर भर देण्यात आला. गोरगरिबांच्या समस्या सोडवण्याबाबत शासन संवेदनशील असून त्यासाठी योग्य निर्णय घेण्यात येत आहेत. सामान्य माणसाला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची कल्पना पुढे आली. या रुग्णालयातील १० टक्के खाटा मोफत आणि ६ टक्के खाटा शासकीय दरानं देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तम सुविधा असलेलं रुग्णालय नागरिकांसाठी उभं रहणार आहे. बाणेर येथे देखील ५५० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येत आहे, असं अजित पवारांनी यावेळी सांगितले.