२४ डिसेंबरनंतर पुढच्या लढाईला तयार रहा, वरवंडच्या विराट सभेत मनोज जरांगे पाटलांची तोफ कडाडली

दौंड : राज्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मराठ्यांच्या लेकरांच्या भल्यासाठी आरक्षणाची लढाई लढत आहे. राज्यसरकाला २४ डिसेंबर पर्यंत कायदेशीर आरक्षण आणि सरसकट कुणबी दाखले मिळावेत यासाठी मुदत दिली आहे. २४ डिसेंबरला आपला विजय निश्चित आहे. पण राज्य सरकारने घात केला तर २५ डिसेंबर पासून समाजाची बैठक घेऊन पुढील दिशा आणि रणनीती ठरवु, आता मात्र आमची सहनशीलता संपली आहे. आरक्षणाला जो विरोध करील त्याला मराठ्यांची पोरं सोडणार नाहीत. असा इशारा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी वरवंड येथे पार पडलेल्या जाहीर विराट सभेत दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे तिसऱ्या टप्प्यातील दौरावर आहेत. गुरुवार (दि.१६) पुणे जिल्हात दौंड तालुक्यातील वरवंड येथे बाजार मैदानात विराट एल्गार सभा पार पडली.

यावेळी उपस्थित मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गोरगरीब मराठ्यांचे मुडदे पाडून सत्तर वर्ष सरकारने पाळलेले बागलबच्चे समिती नेमत्यात. आयोग बनवले पण मराठ्यांची नोंद त्यांना सापडली नाही. ओबीसी मध्ये असतानाही आमच्या मराठ्यांचे पुरावे शोधले नाही, आता समितीने पुरावे शोधण्यास सुरुवात केली.

सन १८०५ पासून २०२३ पर्यंतचे पुरावे आज ठिकठिकाणी सापडू लागले आहेत. या सरकारने ७० वर्षे हे पुरावे कुठे लपून ठेवले होते.? असा सवाल राज्य सरकारला केला. मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण असताना राज्य सरकारने घात केला. त्यांनी ठरवून षडयंत्र केले आणि कायद्यात आरक्षण असतानाही आरक्षण मिळू दिले नाही.

Advertisement

मराठ्यांची पोर मोठी होतील, म्हणून पुरावे का सापडू दिले नाहीत? मराठ्यांच्या विराट शक्तीपुढे सरकार आता जागे झाले. या एकीपुढे सरकारला नमते घ्यावे लागले. म्हणूनच मराठ्यांचा २४ डिसेंबरला विजय होणार आहे. पहिली समिती नुसते घरात बसून पुरावे शोधत होते. आंतरवली च्या आंदोलनात सरकारला प्रश्न विचारण्यात आला की, या समितीमध्ये कोण अभ्यासक गेले होते का? मात्र काहीच उत्तर आले नाही.

त्यानंतर अभ्यासक पाठवून पुरावे सापडण्यात यश आले. आता मात्र मागे हटणार नाही. मराठा जागा झाला आहे. वरवंड च्या मराठ्यांच्या सभेने राज्य सरकारने निर्णय घ्यावा हा इशारा दिला आहे. आपण ७० टक्के लढा जिंकला आहे. हे राजकीय लोकं आपली नाहीत, ज्यांना आपण त्यांना मोठे केले आहे. तेच आपल्या आरक्षणाच्या विरोधात बोलू लागले आहेत.

आपल्या लेकरांचे वाटोळे होऊ देऊ नका. राजकारण्यांना जवळ करू नका. एक डिसेंबर पासून पुन्हा गावागावात साखळी उपोषण सुरू करा. शांततेत आंदोलन करा. सरकार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कायदा पारित होणार आहे. मराठ्यांच्या गोरगरिबांची कल्याण होण्यास सुरुवात झाली आहे. आता लढायचे फक्त मराठ्यांच्या लेकरांसाठी! त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांवर आपल्या शैलीत टीका केली. दरम्यान, एक मराठा, कोटी मराठा घोषणांनी मैदान परिसर दुमदुमला.सभेसाठी येणाऱ्या मराठा बांधवांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, अल्पपोहार, पाण्याची सोय करण्यात आली होती. तसेच स्वयंसेवक व पोलिसांचा ठिकठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page