सारोळ्यात सगळेच एकवटले..! विरोधात सारी भावकी, पण जिंकला तो कृष्णच; सुनेत्रा पवार यांची फेसबुक पोस्ट प्रचंड चर्चेत
सारोळे : बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार समजल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सध्या भोर तालुक्यातील प्रत्येक गावचा भेट दौरा सुरू केला आहे. प्रत्येक गावात जाऊन त्या नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. दरम्यान, आज मंगळवारी(दि. २६ मार्च) त्या भोर तालुक्यातील सारोळे ते गुनंद या तालुक्यातील पूर्व भागातील गावांच्या दौऱ्यावर होत्या. याचा प्रारंभ त्यांनी सारोळे गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन केला. या दौऱ्याच्या धामधुमीत सुनेत्रा पवार यांची एक फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टमधून त्यांनी थेट महाभारताचा दाखला देत शरद पवार गटाला आणि विरोधकांना सवाल केला आहे.
या पोस्ट मध्ये त्या म्हणाल्या आहेत की, सारोळ्यात सगळेच एकवटले..! अवघ्या काही दिवसात आज सहाव्यांदा भोर विधानसभा मतदारसंघ मी पुन्हा एकदा सदिच्छा भेटीसाठी दाखल झाले. सारोळे येथून आज मी या दौऱ्याचा प्रारंभ केला आहे. ज्या ठिकाणाहून मी आज या दौऱ्याची सुरुवात केली, ते ठिकाण पाहून मला माझ्या आजोळची आठवण झाली. त्या अर्थाने आजोळातून मिळणारे प्रेम मला सारोळा येथे मिळणार याची खात्री येथील एकजुटीने मिळाली. यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची दखल मी घेतली असून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी कोणतीही कसूर ठेवणार नाही, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. पुढे पोस्ट मध्ये त्यांनी थेट महाभारताचा दाखला दिला. “श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच, अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत”, असं सुनेत्रा पवार यांनी पुढे फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.