राजा रघुनाथराव विद्यालय आणि भोर पोलीस स्टेशन यांच्यावतीने सायबर जन-जागृती कार्यक्रमाचे आयोजन
भोर : भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि भोर पोलिस स्टेशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित सायबर सुरक्षितता व जागरूकता या विषयी मार्गदर्शपर वर्गाचे आयोजन आज मंगळवारी(दि. १३ फेब्रुवारी) करण्यात आले होते. या कार्यक्रमात सायबर गुन्ह्यांपासून स्वत:चे संरक्षण कसे करावे आणि सुरक्षित राहण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
इंटरनेटचे जग हे अभासी जग आहे. लहानपणी अनोळखी माणसांकडून गोळ्या बिस्कीटे न घेणारी माणसं इंटरनेटच्या जगात सगळ्यांवर विश्वास ठेवू लागली असून सायबर गुन्ह्यांना बळी पडू लागली आहेत. त्यामुळे इंटरनेटचा वापर करताना ऑनलाइन आयुष्यात सरळ मार्गी तसेच जागृत राहण्याचा बहुमोल सल्ला सायबर क्राईम सल्लागार तथा सी.ई.ओ. योगेश ठाणगे यांनी उपस्थित विद्यार्थांना दिला.
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी अतिशय दक्षतेने सायबर सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घ्यावे. आयुष्याच्या कोणत्याही क्षेत्रात काम करा पण सायबर सुरक्षिततेची काळजी घ्या. असे प्रतिपादन कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य लक्ष्मण भांगे यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी व्यासपीठावर पोलीस उपनिरीक्षक सायबर क्राईम पुणे ग्रामीण विलास धोत्रे, नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर, प्र. सचिव गजानन झगडे, डॉ. सुरेश गोरेगावकर, प्राचार्य लक्ष्मण भांगे, रोबोकॉब कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट संचालक प्रा. विजय जाधव, प्रा. तानाजी लवटे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विक्रम शिंदे यांनी केले. तर प्रा. विजय जाधव यांनी आभार मानले.