‘भोरला MIDC आणली नाही तर मत मागायला येणार नाही’, असे म्हणून देखील काही लोक पुन्हा मत मागायला आले पण MIDC काय झाली नाही; अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

कात्रज : भोर परिसरातील एमआयडीसीचा मुद्दा पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावरती तापला असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणूक आल्यानंतर भोर आणि राजगड (वेल्हा) परिसरात एमआयडीसी उभारण्याच्या घोषणा नेत्यांकडून करण्यात येतात. मात्र, निवडणुका नंतर नेत्यांना याबाबतचा विसर पडत असल्याचं चित्र गेल्या अनेक वर्षांपासून भोर आणि वेल्हाकर अनुभवत आहेत. यंदादेखील एमआयडीसीच्या मुद्द्यावरून भोरचे राजकारण तापले असून, सर्व पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत.

राष्ट्रवादी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आज शनिवारी(दि. २७ एप्रिल) आरोह गार्डन(कात्रज, पुणे) येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार म्हणाले, ही निवडणूक भावकीची आणि भावनिक नाही. ही रोजी रोटीची आहे. काही लोक भोर, वेल्हेकरांना एमआयडीसीचे स्वप्न दाखवून गेले.

एमआयडीसीच्या मुद्द्यावरती २०१४ ला मत मागितली. मात्र हे एमआयडीसीचं काम पूर्ण केलं नाही. तरीदेखील तेच लोक २०१९ ला मत मागायला आले होते आणि आताही मत मागत आहेत. मी असतो तर मला लाज वाटली असती. कोणत्या तोंडाने मत मागता आहेत, असा सवाल अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांना केला.

Advertisement

भोर परिसरातील एमआयडीसीचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकसभेची आचारसंहिता संपल्यावर लगेच प्रयत्न करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. यासाठी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन जागेबाबतचा प्रस्ताव आपल्याला द्यावा असंदेखील अजित पवार म्हणाले. आत्ताच्या खासदारांनी कार्यपुस्तिका छापली आहे. त्यात मी केलेली कामं छापली. मी केलं, मी केलं,  ते सांगत आहेत. मात्र, या खासदारांनी भोर साठी काय केलं हे सांगावं असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी नुस्ती भाषणाने विकास होत नसतो, असा टोला सुळे यांना लगावला.

सुप्रिया सुळे यांना तुम्ही तीन वेळा निवडून दिलं आता सुनेत्रा पवार यांना निवडून द्या, मी तुम्हाला एमआयडीसी देणार आहे. मी शब्दाचा पक्का असल्याचं अजितदादा म्हणाले. भोर वेल्हा परिसरामध्ये असलेल्या धरणांचे पाणीवाटप करारानुसार करून पाणी योजना भोर वेल्हा भागासाठी राबवणार असल्याचा अजित पवार यांनी सांगितलं, तसेच या परिसराला नैसर्गिक सौंदर्य लाभले असून, यासाठी पर्यटन वाढवण्याच्या दृष्टिकाेनातूनदेखील उपाययोजना करणार असल्याचंदेखील अजित पवार यांनी सांगितले. यासाठीचा निधी आपण मंजूर करून आणू, असा विश्वास त्यांनी या वेळी दर्शवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page