लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २०३ भोर विधानसभा मतदार संघाचे दुसरे प्रशिक्षण आजपासून सुरू
नसरापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील २०३ भोर विधानसभा मतदारसंघातील कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी दुसरे मतदान प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज शनिवार(दि. २७ एप्रिल) व रविवार(दि. २८ एप्रिल) असे दोन दिवसांचे हे प्रशिक्षण शिबिर असणार आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवारी(दि. २७ एप्रिल) दोन सत्रात आयोजित शिबिराप्रसंगी १२८८ मतदान अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
बारामती लोकसभेची निवडणूक ७ मे रोजी जाहीर झाली आहे. यामुळे सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. या लोकसभा मतदारसंघात २०३ भोर या विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. या भोर विधानसभा मतदारसंघात एकूण ५६१ मतदान केंद्र आहेत. या ५६१ मतदान केंद्रात अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत.
या नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी भोर तालुक्यातील नायगाव(नसरापूर) येथील नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट येथे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मतदान प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात भोर तहसीलदार सचिन पाटील, राजगड तहसीलदार निवास धाणे, मुळशी तहसीलदार रणजित भोसले, नायब तहसीलदार अरुण कदम, अमित कदम व तहसील कार्यालय भोर, राजगड, मुळशी येथील सर्व कर्मचारी उपस्थीत होते.
या मतदान प्रशिक्षण शिबिरात उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राजेंद्र कचरे यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनात त्यांनी मतदान प्रक्रियेत कोणती काळजी घ्यावी, कशा पद्धतीने हाताळणी करावी याची सविस्तर माहिती कर्मचारी व अधिकाऱ्यांना करून दिली. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंका कुशंकांचेही त्यांनी निराकरण केले. तसेच आजचे प्रशिक्षण झाल्यावर कर्मचारी यांना मतदान यंत्राचे प्रात्यक्षिकही देण्यात आले. तसेच उर्वरित प्रशिक्षण हे उद्या होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.