पोलीस असल्याची बतावणी करून महिलेचे दागिने केले लंपास; किकवीतील घटनेने परिसरात खळबळ
किकवी : पोलीस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी व्यक्तींनी एका महिलेचे ७२ हजार रुपयांचे दागिने लंपास केले असल्याची घटना सोमवारी (दि. ३० डिसेंबर) सकाळी साडे नऊ वाजता किकवी (ता .भोर) गावच्या हद्दीत घडली. याप्रकरणी सरस्वती सोपान कोंढाळकर (वय ७० वर्ष, रा. किकवी, ता. भोर) यांनी दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे किकवी गावच्या हद्दीतील शिवारात घर आहे. सोमवारी सकाळी त्या घरी पाळलेल्या कोंबड्या शिवारात सोडत असताना अचानक मोटार सायकलवरून दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्या जवळ आल्या. त्यावेळी त्यांनी आम्ही पोलीस असून चोरांचा शोध घ्यायला हिकडे आलो असल्याचे सांगुन गळ्यातील सोन्याच्या दागिन्याची नोंद करावयाची आहे, म्हणत गळ्यातील दागिने मागितले. यावेळी फिर्यादी महिलेने नकार देत असताना त्यातील एका व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील ७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गंठण, ५ ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याच्या मण्याची पोत बळजबरीने ओढून घेऊन पुणे-सातारा महामार्गाच्या दिशेने धूम ठोकल्याची फिर्याद सरस्वती सोपान कोंढाळकर या महिलेने दिली आहे. दिलेल्या फिर्यादी वरून दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.