भोर तालुक्यातील पसुरे येथील गोळीबार प्रकरणी रिसॉर्ट मालकास भोर पोलिसांनी केली अटक
भोर : भोर तालुक्यातील पसुरे गावच्या हद्दीतील कुंजवन रिसॉर्टच्या परिसरात बुधवारी(दि. १५ मे) दुपारी स्थानिक शेतकरी व रिसॉर्ट मालक यांच्यात झालेल्या वादातून रिसॉर्ट मालक यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात भोर पोलिसांनी अखेर रिसॉर्ट मालक हितेश पाल सिंग(सद्या रा. कुंजवन रिसॉर्ट, पसुरे, ता.भोर) यांवर कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत अशोक गेनबा बिऱ्हामणे(वय ५३ वर्ष, रा. बि-हामणे वस्ती, पसूरे, ता. भोर) यांनी फिर्याद दिली आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक बिऱ्हामणे यांची पसुरे येथील उंदीरमाळ परिसरात गट क्र. १८८ येथे शेती आहे. त्यांच्या शेतजमिनीत अतिक्रमण करत अंदाजे २० ते २५ फूट अंतरावर ठिकठिकाणी नवे सिमेंटचे पोल रोवले असल्याची माहिती बिऱ्हामणे यांना मिळताच ते काही स्थानिक शेतकऱ्यांबरोबर पाहणी करण्यासाठी पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांना पाहून पोल रोवणारे कामगार पळून गेले. त्यांनतर काही वेळाने रिसॉर्ट मालक हितेश पाल सिंग हा त्याच्या हातात दोन बंदूक घेऊन तिथे आला. तेव्हा बिऱ्हामणे व स्थानिक शेतकऱ्यांनी “तू आमच्या जागेत अतिक्रमण करून पोल घालू नको, तुझ्या जागेत तू पोल घालून तुला काय करायचे आहे, ते कर” असे सांगितले. याचा हितेश पाल सिंग यास राग येऊन त्याने “शटअप तुम यहा से चले जाओ, पीछे हट जाओ, नही तो मै तुमको गोली मार दूंगा, मरेगा तुम मरेगा” असे बोलून त्याने त्याच्या हातातील एक बंदूक बिऱ्हामणे व शेतकरी बाळासाहेब विठ्ठल सणस यांच्या दिशेने रोखून त्यातून एक फायर केला. त्यांनतर परत सिंग याने दुसरी बंदूक उचलून त्यातून दुसरा फायर केला. परंतु फिर्यादी हे बाजूला झाल्याने तो फायर त्यांना लागला नाही. हितेश पाल सिंग हा ब्रिगेडियर असल्याचे सांगून त्याच्याकडे बंदूक असलेला फायदा घेऊन त्याचा धाक दाखवून त्याने फिर्यादी बिऱ्हामणे व इतर शेतकऱ्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असून सर्वांच्यात व गावात दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार रिसॉर्ट मालक हितेश पाल सिंग(सद्या रा. कुंजवन रिसॉर्ट, पसुरे, ता.भोर) यांवर बुधवारी रात्री उशिरा कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली असून सिंग यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती भोर पोलिसांनी दिली. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.