भोर तालुक्यात संततधार पाऊस; भाटघर धरणात ५८ टक्के तर नीरा-देवघर धरणात ५० टक्के पाणीसाठा

भोर : भोर तालुक्यात काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून ओढे-नाले, नद्या तसेच धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. भोर शहरातील राजवाडा चौकाजवळील शनीघाटावर भोलावडे गावाला जाणारा नीरा नदीवरील छोट्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे या पुलावरील मार्ग बंद झाला आहे. गेल्या वर्षी १८ जुलैला या छोट्या पुलावरून पाणी वाहत होते.

नीरा-देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नीरा नदीच्या उगमस्थानी शिरगाव येथे ६६ मिमी पावसाची नोंद झाली असून या वर्षी आत्तापर्यंत २ हजार ११ मिमी पाऊस झालेला आहे. भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील भुतोंडे येथे ४८ मिमी पावसाची नोंद झाली असून तेथे यावर्षी १ हजार ८०३ मिमी पाऊस झालेला आहे. सद्यस्थितीला भाटघर धरणात ५८ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. तर, नीरा देवघर धरणात ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

भोर, वेल्हे(राजगड), मुळशी घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस

भोर, वेल्हे(राजगड), मुळशी घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस सुरू असून या भागात २०० मिलिमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे. मुळशी धावडी भागात २२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

समाधानकारक पावसामुळे पिकांसाठी पोषक वातावरण 

Advertisement

दरवर्षीच्या तुलनेने यावर्षी उशिरा पाऊस सुरू झाला असला, तरी भातलागणीसाठी पाऊस समाधानकारक आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, चवळी, भुईमूग, घेवडा या पिकांनाही पोषक वातावरण तयार झाले असून, ही पिके तरारली आहेत. यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करीत आहे

उन्हाळ्यात जलसंकट उभे राहू नये, यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करण्याची मागणी

गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणातील पाणीसाठा लवकरच कमी झाला होता. यामुळे उन्हाळ्यात परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी पाण्याचा तुटवडा भासू लागल्याने स्थानिकांपुढे जलसंकट उभे राहिले होते. यावर्षी उन्हाळ्यात स्थानिक नागरिकांना पिण्यासाठी पाणी अपुरे पडू लागल्याने त्यांच्या पुढे जलसंकट उभे राहिले होते. भाटघर प्रशासनाने असे जलसंकट उभे असतानाही धरणातून जोरदार विसर्ग सुरू ठेवला होता. भाटघर पुनर्वसन सेवा संघाने याची दखल घेत मे महिन्यात दोन वेळा आंदोलन केले होते. उन्हाळ्यात स्थानिक नागरिकांपुढे पुन्हा जलसंकट उभे राहू नये, यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी मागणी भाटघर पुनर्वसन सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page