खंबाटकी घाटाजवळ टँकर मधून गॅस चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! जागा मालकासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; तब्बल ७१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
खंडाळा : पुणे-बंगळुरु महामार्गावरील खंबाटकी घाटाजवळील हद्दीमध्ये असणाऱ्या बंद ढाबाच्या पाठीमागे गॅस टँकरचालकांना हाताशी धरत टँकरमधील गॅस चोरून तो व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये भरणाऱ्या टोळीतील दोघांना मुंबईच्या शिधा पुरवठा पथकाच्या भरारी पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांचे चार साथीदार पळून गेले असून, अटकेतील दोघांकडून गॅस टँकर अवैध साठवणूक केलेले सिलेंडर व गॅस टँकरमधून सिलेंडरमध्ये भरण्यासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक साहित्यासह तब्बल ७१ लाख ७ हजार ९५३ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बंद ढाबाच्या जागेत अवैधरित्या टँकरमधून भरला जायचा सिलेंडरमध्ये गॅस
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाट पायथ्याशी असणाऱ्या बेंगरुटवाडी गावच्या हद्दीमध्ये गुरुनानक पंजाबी धाबा आहे. याठिकाणी खंडाळा नगरपंचायत माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक पंकज गायकवाड याच्या मालकीच्या जागेमध्ये सराईत गुन्हेगार व आंतरराज्य टोळीचा प्रमुख देवराज जानी हा आपल्या सहकाऱ्यांसमवेत अवैधरित्या गॅस टँकरमधून सिलेंडरमध्ये गॅस भरुन घेत असल्याची माहिती नागरी पुरवठा विभागाचे संचालक सुधाकर तेलंग यांना मिळाली होती.
दोन दिवस ढाब्यावर लक्ष ठेवून असणाऱ्या अधिकाऱ्यांनी अखेर मारला छापा
यानुसार सुधाकर तेलंग यांच्या सूचनेनुसार शिधा वाटपचे उपनियंत्रक गणेश बेल्लाळे, सहाय्यक नियंत्रक विनायक निकम यांच्यासह इतरांचे पथक दोन दिवस घाटाजवळील ढाब्यावर लक्ष ठेवून होते. त्यानुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने पथक तयार करीत संबंधित ठिकाणी अचानकपणे छापा टाकला.
कारवाईत ७१ लाख ७ हजार ९५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त
यामध्ये २० लाख रुपये किमतीचा कॅप्सूल टँकर (आरजे ५१ सीए ४०९५), १३ लाख ९ हजार ९३२ रुपये किमतीचा १७ हजार ५५० किलो ग्रॅम भरलेला गॅस असलेला कॅप्सूल टँकर, २४ हजार ६८१ रुपयांचे टँकरच्या पाईपलाईनला जोडलेले ६ व्यवसायिक गॅस सिलेंडर, ३ लाख रुपये किमतीची सुपर कॅरी वाहन (एमएच १२ क्यूडब्ल्यू ०९५३), २० लाख रुपये किमतीचा कॅप्सूल टँकर (एमएच १२ एक्सएम ६०५३), ७ लाख ४६ हजार ४७ रुपये किमतीचा कॅप्सूल टँकर १७ हजार ५८० किलोग्रॅम भरलेला गॅस असलेला टँकर, 4 लाख रुपये किमतीची जीप (आरजे ४३ जीए ३८८३), ३९ व्यवसायिक गॅस सिलेंडर भरलेली ५३ हजार ६०० रुपये किमतीची जीप (एमएच १२ क्यूडब्ल्यू ०९५३), २४ व्यवसायिक गॅस सिलेंडर भरलेली ९८ हजार ७२४ रुपये किमतीची जीप (आरजे ४३ जीए ३८८३), व्यवसायिक रिकामे गॅस सिलेंडर भरलेली ३१ हजार २०० रुपये किमतीची जीप (आरजे ४३ जीए ३८८३), ६१०५ रुपये किमतीचे २ भरलेले गॅस सिलेंडर, ३ हजार ५२ रुपये किमतीचे गॅस सिलेंडर, धाब्याच्या पाठीमागील बाजूस १९ किलो वजनाचे ७४ हजार ४३ रुपये किमतीचे १८ गॅस सिलेंडर, शौचालयात ठेवलेले २० हजार ५६७ रुपये किमतीचे ५ गॅस सिलेंडर असा एकूण ७१ लाख ७ हजार ९५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये गुन्ह्यात वापरलेले २ कॅप्सूल टँकर, २ जीप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जागा मालकासह तब्बल १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
यामध्ये तब्बल १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये व्यवस्थापक हरी ओम सिंग, टँकर चालक मोहम्मद तौफिक, २ टँकर चालक, टँकर ट्रान्स्पोर्टर, अवैध व्यवसाय चालविणारा आंतरराज्य टोळीचा प्रमुख देवराज जानी, जागा मालक व खंडाळा नगरपंचायत माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक पंकज गायकवाड, २ टँकर मालक, १ टँकर वाहतूकदार, २ जीप चालक, १ जीप मालक असा १३ जणांविरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशनला खंडाळा तहसीलदार कार्यालयाच्या पुरवठा अधिकारी स्मिता आगाशे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यासह सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अवैधपणे गॅस सिलिंडर पुरवणाऱ्या एजन्सींवर कारवाई होणार
या कारवाईत पुरवठा विभागाचे राजीव भेले, प्रकाश पराते, सुधीर गव्हाणे, चंद्रकांत कांबळे हे सहभागी झाले होते. अशाप्रकारे विनापरवाना गॅस साठवणूक व हाताळणी करत करणाऱ्या व त्यांना अवैधपणे गॅस सिलिंडर पुरवणाऱ्या एजन्सींची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे विनायक निकम यांनी सांगितले. या घटनेचा खंडाळा पोलीस निरीक्षक सुनील शेळके हे अधिक तपास करीत आहे.
टँकरमधून गॅस काढणे हे धोकादायक असून, त्यामुळे अपघात घडू शकतो. परवाना नसताना सिलिंडरचा साठवणूक व विक्री करण हे कायद्याने गुन्हा आहे. राज्यभर पुरवठा विभाग कार्यालयाकडून या प्रकारांवर नजर ठेवण्यात येणार आहे.
– सुधाकर तेलंग, संचालक व नियंत्रक शिधावाटप व नागरी पुरवठा विभाग