मुळशी तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची तालुकाध्यक्ष सचिन खैरे यांची तहसीलदारांकडे मागणी
मुळशी : मुळशी तालुक्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात होत असणाऱ्या अवकाळी पावसामुळे बागायती शेतीसह, फळझाडांचे तसेच जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी करत त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन खैरे यांनी मुळशी तहसीलदार रणजित भोसले यांच्याकडे केली आहे. तशा आशयाचे निवेदन अध्यक्ष खैरे यांनी समक्ष भेट घेऊन तहसीलदार भोसले यांना दिले. यावेळी संतोष लोयरे, सचिन सावंत, नितीन लोयरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
”पावसाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याबाबतच्या सूचना कृषी विभागास दोन दिवसांपूर्वीच दिल्या आहेत. त्याप्रमाणे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे करण्यात येतील.”
– रणजीत भोसले, तहसीलदार मुळशी