दारूच्या नशेत झालेल्या वादातून मित्राचाच केला खून; वाल्हे परिसरातील घटना
वाल्हे : जेजुरी पोलिस ठाणे हद्दीतील वाल्हे गावानजीक असणार्या एका ढाब्यावर दारूच्या नशेत एका तरुणाच्या डोक्यात वीट आणि बाटलीने मारहाण करून तिघा मित्रांनी गंभीर जखमी केल्यामुळे अखेर गंभीर जखमी असणार्या या तरुणाचा मृत्यू झाला असून, जेजुरी पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. पवन संभाजी शेलार (वय ३६ वर्ष, रा. काळदरी, ता. पुरंदर, ह. मु. जेजुरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच विकास अर्जुन भोसले (रा. पिंगोरी) आणि अविनाश आत्माराम पवार (रा. आडाचीवाडी, वाल्हे, ता. पुरंदर) या दोघांना जेजुरी पोलिसांनी अटक केली असून, मुख्य आरोपी आरोपी तुषार शरद यादव (रा. पिंगोरी) हा फरार झाला आहे. याप्रकरणी ईश्वरी संभाजी शेलार (रा. बारसुडे नगर, जेजुरी) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १४ मे) वरील चौघेजण वाल्हेनजीक असणार्या ढाब्यावर दारू पिण्यासाठी गेले होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत पैशाच्या कारणावरून पवन शेलार व तुषार यादव, विकास भोसले, अविनाश पवार यांच्यात भांडण झाले. या वेळी या तिघांनी पवन शेलारच्या डोक्यात वीट व बाटलीने मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले. अशा गंभीर अवस्थेत पवन शेलार यास सोडून तिघे आरोपी पळून गेले.
यानंतर पवन शेलार यास उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्याचा बुधवारी (दि. १५ मे) मृत्यू झाला. पोलिसांनी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली असल्याचे जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी सांगितले. सदर घटनेचा पुढील तपास आयपीएस अधिकारी दर्शन दुगड व सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे करीत आहेत.