पुणे-सातारा महामार्गावर शिवरे गावच्या हद्दीत कंटेनरचा विचित्र अपघात
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर शिवरे(ता.भोर) गावच्या हद्दीत आज शनिवारी(दि. १ जून) दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास एक विचित्र अपघात झाला. या अपघातात एक कंटेनरने चक्क महामार्गावरील साताऱ्याकडे जाणाऱ्या लेनवरून रस्ता दुभाजक पार करून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील एका चारचाकी गाडीला धडक दिली. यात कंटेनर चालक जखमी झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-सातारा महामार्गावरून माल वाहतूक करणारा एक कंटेनर(एन एल ०१ ए जी ५८१०) पुण्याकडून साताऱ्याच्या दिशेला चालला होता. दुपारी साडेतीनच्या दरम्यान शिवरे गावच्या हद्दीत हा कंटेनर आल्यानंतर चालकाचे त्यावरचे नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर थेट रस्ता दुभाजक ओलांडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील लेनवर जाऊन पुण्याकडे जाणाऱ्या एका इन्नोव्हा(एम एच ०१ डी एक्स ९१४९) कंपनीच्या कार ला धडकला. यात कंटेनर चालक जखमी झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस व महामार्ग पोलिस घटनास्थळी पोहचले. या अपघातात हा कंटेनर महामार्गावर आडवा झाल्यामुळे वाहनांना प्रवास करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला हटवण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांकडून यावेळी सांगण्यात आले.