ग्राहकांनी ऑनलाईन फसवणूक टाळावी – प्रांताधिकारी डॉ.विकास खरात
भोर : ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी भारतात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने उभारलेल्या चळवळीला यश येऊन केंद्रसरकारच्या वतीने ग्राहक हितासाठी जगातील सर्वांत प्रभावी कायदा भारतात अमलात आला आहे. ग्राहकांनी या कायद्याची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा. तर ग्राहकांनी ऑनलाइन फसवणूक टाळावी असे मत प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी व्यक्त केले.
भोर तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अन्न नागरी पुरवठा व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहकदिनानिमित्त भोर येथे ग्राहकांना कायद्याविषयी मार्गदर्शन करताना डॉ. खरात मंगळवारी(दि.२४ डिसेंबर) बोलत होते.
यावेळी तहसीलदार राजेंद्र नजन, ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष जमीर आतार, निवासी नायब तहसीलदार डॉ. अरुण कदम, पुरवठा निरीक्षक प्रीतम गायकवाड, पुरवठा अधिकारी इम्रान मुलानी, ग्राहक पंचायत संघटक अनिल गिरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खोपडे, प्रकाश बढे, नरेंद्र आमडेकर, सुनील शेलार,अभय सुपनेकर, विजय आपटीकर आदींसह ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.