भोरमध्ये एकाच रात्री चार घरफोड्या; तब्बल २६ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल लंपास
भोर : भोर शहरात असलेल्या श्रीपतीनगर (भोर, जि. पुणे) येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद असलेली चार घरे फोडली असून तेथून १८ तोळे सोने, अडीच किलो चांदी, ९ लाख रुपये रोख असा एकूण २६ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल चोरून चोरटे फरार झाले आहेत. रविवारी (दि. १२ जानेवारी) रात्री ते सोमवारी (दि.१३ जानेवारी) पहाटेच्या वेळात या घरफोड्या झाल्या असून चारही घरे बंद असल्यामुळे घरातील व्यक्ती सोमवारी सकाळी घरी आल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत माधव पुरोहित (रा. श्रीपतीनगर, भोर) यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार भोर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील श्रीपतीनगर येथील भारती दीपक मोरे, सविता विलास जेधे, माधव पुरोहित, ॠषीकेश वंजारी यांची बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारती मोरे या रविवारी दुपारी कुटुंबासह बाहेरगावी लग्नसमारंभासाठी गेल्या होत्या. सोमवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास त्या घरी आल्या. त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या कुलपाचा कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
घरातील सर्व खोल्यांमधील कपाटांची आणि ड्रॉवरची उलथापालथ केली. दिवाणमधील सामानही काढून फेकून दिले. भारती मोरे यांनी दिवाणाच्या आत कपड्यांमध्ये ६ लाखांची रोकड असलेली पर्स ठेवली होती. त्या पर्समधील पैसे चोरट्यांनी काढून नेले. भारती मोरे यांचा मुलगा परदेशात शिक्षण घेत आहे. त्याला पैसे पाठविण्यासाठी त्यांनी दागिने गहाण ठेवून आणि नातेवाईकांकडून पैसे जमा केले होते.
दुसरी चोरी पोलिस ठाण्यासमोर सविता जेधे यांच्या घरात झाली. त्या सोमवारी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी रविवारी सायंकाळी आपल्या मूळगावी गेल्या होत्या. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्या घरी आल्यावर त्यांच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा उचकटलेला आणि दरवाजा उघडा होता. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले तर घरातील सर्व सामान अस्थाव्यस्त केलेले दिसले. त्यांच्या कपाटातील लॉकर तोडून छोट्या पाकीटातील ५० हजारांची रोख रक्कम चोरून नेली.
तिसरी चोरी माधव पुरोहित यांच्या घरी झाली. घरातील सर्वजन पुण्याला गेले त्यावेळी चोरांनी दरवाची कडी तोडून घरात प्रवेश करून घरातील १४ तोळे सोने, अडीच किलो चांदी आणि २ लाखाची रोकड चोरून नेली. घरात लग्न समारंभ असल्याने सोने चांदी बनवून ठेवले होते आणि रोकड आणली होती. चौथी चोरी भानुदास कृष्णा वंजारी यांच्या घरी झाली. त्यांच्या घरातून ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि ४ तोळे सोन्याचे दागिने चोरांनी पसार केले.
या घटनेने शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्वान पथकाने घरांची पाहणी केली असून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्ह्याचा पुढील तपास भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक करपे करत आहेत.