आ. संग्राम थोपटे विरुद्ध शंकर मांडेकर अटीतटीची लढत का “नुरा कुस्ती”? उमेदवार मात्र किरण दगडे पाटील असल्याची मुळशीत चर्चा?
मुळशी : काही दिवसांपूर्वी भोर विधानसभेची जागा ही महायुतीकडून शिवसेनेला (शिंदे) मिळणार असून तुम्हालाच उमेदवारी मिळणार असल्याचा शब्द शिवसेने कडून शिवसेना जिल्हा संघटक कुलदीप कोंडे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे व भारतीय जनता पार्टीचे भोर विधानसभेचे निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील यांना देण्यात आला होता. परंतु अचानक राजकीय घडामोडी घडत ही जागा महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली. अजित पवारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शंकर मांडेकर यांना आयात करत उमेदवारी दिली. शंकर मांडेकर यांना उमेदवारी मिळेल म्हणून किंचित कुठेही चर्चा नसताना चर्चेत असणाऱ्या नावांपेक्षा वेगळं नाव कुठून आलं? त्यामुळे अजित पवार पक्षाकडून दिलेला उमेदवार हा डमी असून ही नुरा कुस्ती असल्याची चर्चा भोर विधानसभेतील मुळशी तालुक्यातील जनतेत रंगली आहे.
नुरा कुस्ती म्हणजे काय? तर नुरा ही अशी कुस्ती असते ज्यात दोन्ही पैलवान दिखाऊपणासाठी एकमेकांशी लढतात. परंतु, या लढतीचा निकाल अधीच निश्चित असतो. केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी दोघांमध्ये लढाई केली जाते. तशीच लढत संग्राम थोपटे विरुद्ध शंकर मांडेकर यांची भोर विधानसभेत दिसत असल्याची चर्चा मात्र सर्व ठिकाणी आहे. मुळशी तालुक्यात शंकर मांडेकर यांच्यापेक्षा जास्त ताकद असलेले किरण दगडे पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या मुळशी तालुक्यातील युवक, महिला व ज्येष्ठांनी त्यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. त्यांच्या विधायक कामामुळे ते भोर विधानसभेतील गावागावात घराघरात पोहोचले आहेत.
तसेच ऐन निवडणुकीत शंकर मांडेकर यांनी दगा दिल्यामुळे मुळशीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कानामागून येऊन तिखट होऊन शंकर मांडेकर यांना उमेदवारी मिळाल्याने मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील किरण दगडे पाटील यांना आपला पाठिंबा दर्शवला असल्याची चर्चा मुळशी तालुक्यातील सर्व ठिकाणी आहे. त्यामुळे ही लढत संग्राम थोपटे विरुद्ध शंकर मांडेकर नसून संग्राम थोपटे विरुद्ध किरण दगडे पाटील होणार असल्याची चर्चा मुळशी तालुक्यात नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.