चेलाडी फाटा (नसरापूर) येथे गळफास घेऊन ३८ वर्षीय युवकाची आत्महत्या
नसरापूर : चेलाडी फाटा (नसरापूर, ता. भोर) येथील एका बांधकाम साईडवर सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या ३८ वर्षीय युवकाने साईटवर राहत असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. निवृत्ती दादाभाऊ पळसे (मुळ रा. वखारी ता. जि. जालना, सध्या रा. नसरापुर, ता भोर) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. ३० नोव्हेंबर) रात्री उघडकीस आली. करण नानासो खरात (वय २१ वर्ष, धंदा ड्रायव्हर रा. नसरापुर, ता भोर) यांनी याबाबत राजगड पोलिसांना खबर दिली.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खबर देणारे करण खरात हे गेली चार वर्षापासून नसरापूर येथे राहावयास असून गणेश जाधव यांच्याकडे डंपर ड्रायव्हर म्हणून काम करतात. शनिवारी रात्री खरात यांना गणेश जाधव यांनी फोन करून सांगितले की, “मयुर पोकळे यांच्या साईटवर काम केलेले चलन घेवुन ये”, त्यानंतर खरात हे चेलाडी फाटा जवळील जनावरांच्या दवाखान्यासमोर असलेल्या साईटवर गेले असता मयत निवृत्ती पळसे हे शेडमध्ये वायरच्या सहाय्याने गळफास घेतलेले आढळून आले. यांनतर या घटनेची माहिती राजगड पोलिसांना देण्यात आली. राजगड पोलीसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भोर येथील उपविभागीय रुग्णालयात पाठवला. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर घटने बाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार अजित माने करीत आहेत.