शिरवळ बस स्थानकामधून महिलेचे तब्बल ३ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी; शिरवळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
शिरवळ : शिरवळ (ता.खंडाळा) येथील बस स्थानकामधून गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महीलेच्या बॅगमधून रोख रक्कम व तब्बल ३ लाख १० हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. त्याबाबत शिरवळ पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कल्याणी विकास कुंभार (वय ३६ वर्षे, सध्या रा. रामबाग सिटी शिरवळ, ता. खंडाळा) या शनिवार (दि. १३ जानेवारी) रोजी संक्रांतीचा सणासाठी मूळ गावी मोळडिस्कळ (ता. खटाव) येथे जाण्यासाठी रिक्षाने सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी शिरवळ बसस्थानक येथे आल्या. गावी जाताने त्यांनी त्यांचे घरातील सोन्या चांदीचे दागिने सोबत घेऊन जाताना बॅगमध्ये ठेवले होते. त्यामधे सोन्याचा राणी हार, मिनीगंठण, साखळीतील मोठागंठण, कानातील टॉप्स, वेल, नथ, काळे मण्यातील मनीमंगळसूत्र, तसेच चांदीचा छल्ला इत्यादी दागिने होते. कुंभार या गावी जाण्यासाठी बसमध्ये बसल्या. त्यावेळेस गर्दी असल्यामुळे त्यांना गर्दीमधून बसमध्ये प्रवेश करावा लागला. बसमध्ये बसल्यावर त्यांच्या लक्षात आले की बॅगच्या दोन्ही चैन उघड्या आहेत. बॅगमध्ये व्यवस्थित पहिल्या नंतर त्यांना त्यांचे दागिने आढळून आले नाहीत. बॅगमधील दागिने चोरी झाले असल्याची त्यांना खात्री झाली असता त्यांनी शिरवळ पोलीस स्टेशनकडे धाव घेऊन बॅगमधील रोख रक्कम व दागिने चोरी झाल्याची शिरवळ पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलिस करीत आहेत.