तीस वर्षीय पैलवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने जिममध्ये मृत्यू; लग्नाचं स्वप्न राहिलं अधुरं
मुळशी : कुमार महाराष्ट्र केसरीसह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मुळशीचे नाव करणारा पैलवान विक्रम पारखी(वय ३० वर्ष) याचा जिममध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. विक्रम हा मुळशी तालुक्यातील मानगावचा रहिवाशी असून त्याचा १२ डिसेंबरला विवाह होणार होता. विवाहापूर्वी मृत्यू झाल्यामुळे कुस्तीक्षेत्रासह मुळशीवर शोककळा पसरली आहे. हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र, या पैलवानाला रुग्णालय दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.
विक्रमने २०१४ साली महाराष्ट्र केसरी किताब जिंकला होता. त्याला सन्मान म्हणून गदा देण्यात आली होती. तसेच झारखंडच्या रांचीतील आयोजित राष्ट्रीय कुस्ती टुर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवला होता. या टुर्नामेंटमध्ये कान्स पदक जिंकलं होतं. विक्रमने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. विक्रमच्या पश्चात त्याचे आई-वडील आणि भाऊ-बहीण असा त्याचा परिवार आहे. भाऊ आणि बहीण या दोघांचं लग्न झालं आहे. विक्रमचे वडील शिवाजीराव पारखी भारतीय सैन्य दलात सैनिक होते. त्यांच्या वडिलांनी पाकिस्तानविरुद्ध कारगिल युद्धात सहभाग नोंदवला होता. युवा मुलाला गमावल्याने त्यांच्यासह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.