तब्बल २५ वर्षांनंतर शरद पवारांनी वेल्हयात(राजगड) सभा घेतली; सुप्रिया सुळेंनी मात्र वेल्हेकरांना आश्वासनांची खैरात वाटली
राजगड : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ प्रदीर्घ कालावधीनंतर म्हणजे पंचवीस वर्षानंतर शरद पवार यांनी वेल्ह्यात(राजगड) आज मंगळवारी(दि. ३० एप्रिल) मेंगाई देवस्थान ट्रस्टच्या कुस्ती आखाडा मैदाना समोरील प्रांगणात सभा घेतली. या सभेमध्ये शरद पवार काय बोलणार याची मोठी उत्सुकता वेल्ह्यातील(राजगड) नागरिकांना लागली होती. परंतु शरद पवारांनी वेल्हे(राजगड) तालुक्याच्या बाबतीत, विकासावर, प्रश्नांवर कोणतेही वक्तव्य न करता फक्त भाषण संपवताना “इथे काही प्रश्न मांडले गेले, त्यामध्ये योग्य लक्ष घालू. मी स्वतः खासदार आहे. मी एवढेच सांगेल” एवढेच बोलले. त्यामुळे या सभेत वेल्हे(राजगड) तालुक्यातील बरेचसे युवक, महिला, ज्येष्ठ नाराज झालेले पहायला मिळाले.
शरद पवारांच्या भाषणा अगोदर बोलताना सुप्रिया सुळेंनी मात्र वेल्हेकरांना(राजगड) आश्वासनांची खैरात वाटल्याचे पहायला मिळाले. त्यामध्ये त्या बोलल्या की, आमचे सरकार आल्यावर दुधाला हमीभाव देणार. शेतकऱ्यांच्या अवजारावर “शून्य टक्के जीएसटी” आकारणार. तसेच या सरकारच्या काळात कांदा, सोयाबीन, कपास्याला भाव नाही. मुळात या सरकारला निर्यात-आयात धोरण कधी कळलेच नाही. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, भोर विधानसभा मतदार संघात भोर-मुळशीला आम्ही चांगले शाळा-कॉलेज करू शकलो. परंतु शाळा-कॉलेजला आता काही डिमांड राहिलेले नाही. असं काहीतरी चांगलं पर्यटन कॉलेज काढू की, ज्यातून वेल्ह्यातील पर्यटन कसे वाढेल. आणि हिते राहून मुलांना हाताला काम कसे मिळेल. त्या पद्धतीचे कॉलेज काढू. तसेच पुढे त्या बोलल्या की, तुम्ही मला निवडून दिल्यानंतर पुढच्या पाच वर्षात पाणी, पर्यटन आणि एक दोन मोठे रस्ते करण्यासाठी मी कटिबध्द असेल. असे सुप्रिया सुळे बोलल्या. यामुळे मात्र “तब्बल २५ वर्षांनंतर शरद पवारांनी वेल्हयात(राजगड) सभा घेतली आणि सुप्रिया सुळेंनी मात्र वेल्हेकरांना आश्वासनांची खैरात वाटली” अशी चर्चा वेल्ह्यातील(राजगड) नागरिकांकडून सगळीकडे ऐकायला मिळाली.