सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वसतिगृहात गांजा; दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : विद्येचे माहेरघर समजल्या जाणार्या पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला अनन्यसाधारण महत्व आहे. अशा विद्यापीठाच्या वसतीगृहात पोलिसांना गांजा आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघा विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत प्रा़. संजयकुमार पुंडलिकराव कांबळे (वय ४६, रा. दापोडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रतिक अंकुश गुजर (वय २०, रा. पिरंगुट, मुळशी), आकाश मयंक ब्रम्हभट (वय २०, रा. श्रीनिवास पार्क, बाणेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडे हिरव्या रंगाची वाळलेली पाने व बिया असलेला गांजा एका प्लस्टिक पुडीमध्ये आढळून आला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक आहे. विद्यापीठाच्या आवारात तरुण तरुणीसाठी तसेच वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी मिळून जवळपास १४ वसतीगृहे आहेत. त्यातील एका वसतीगृहातील रुम नंबर ८३ जी ५ मध्ये हे दोघे रहायला आहेत. फिर्यादी संजयकुमार कांबळे हे २०२३ पासून रेक्टर म्हणून कामकाज पहात आहेत. ते नियमितपणे विद्यार्थ्यांची तपासणी करतात. त्यांची उपस्थिती नोंदवून घेतली जाते. ते विद्यापीठात असताना बुधवारी सायंकाळी ५ वाजता एक फोन आला. त्यात रुम नंबर ८३ मधून गांजा अगर अमली पदार्थाचा वास येत आहे. त्यानंतर ते विद्यापीठ सुरक्षा रक्षक भारत ठुबे यांना घेऊन रुम नंबर ८३ येथे आले. रुममध्ये प्रतिक गुजर व आकाश ब्रम्हभट होते. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिले. त्यांना संशय आल्याने त्यांनी चतु:श्रृगी पोलिसांना बोलावले. पोलीस आल्यावर त्यांनी दोघांची झडती घेतली. त्यात आकाश ब्रम्हभट याच्या पॅन्टच्या खिशात १२ ग्रॅम वजनाची प्लॅस्टिकची गांजा असलेली पुडी मिळून आली. सदर घटनेबाबत पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगुले अधिक तपास करीत आहेत.