भोर तालुक्याच्या पुणे-सातारा महामार्गा लगतच्या गावांमध्ये एकाच रात्री चोरट्यांनी फोडली चार दुकाने; चोरटे सीसीटीव्हीत कैद
नसरापूर : भोर तालुक्याच्या पुणे-सातारा महामार्गा लगतच्या गावांमध्ये एकाच रात्री चोरट्यांनी चार दुकाने फोडून रोकडसह मुद्देमाल चोरून नेला आहे. यातील एका दुकानात चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून राजगड पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नसरापूर(ता.भोर) येथील उद्योजक मोबाईल शाँपी सह पुणे-सातारा महामार्गावरील शिवरे येथील ओमकार मिसळ हाऊस, केळवडे फाट्यावरील श्रीनाथ दुध डेअरी व धांगवडी येथील संकल्प हॉटेल अशी चार दुकानांची शटर उचकटुन चोरट्यांनी आत घुसुन चोरी करुन दुचाकीवरून पळ काढला आहे. या घटना गुरुवारी (दि.५ डिसेंबर) रात्रीच्या दरम्यान घडल्या आहेत.
नसरापूर येथील पुजारी यांच्या उद्योजक मोबाईल शाँपी मध्ये एका बाजुने शटर उचकटुन तीन चोरट्यांनी
आत प्रवेश करुन दुरुस्तीसाठी आलेले मोबाईल, ब्लुटुथ व एक नवा मोबाईल अशा ऐवजांची चोरी केली असल्याची तक्रार पुजारी यांनी केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीसकर्मचाऱ्यांनी घटनास्थळीतील भेट देऊन पाहणी केली आहे.
केळवडे येथील श्रीनाथ डेअरी व केक शाँप मध्ये देखिल दुकानाचे शटर उचकटुन चोरट्यांनी आतील काँउंटर मधील तीन हजार रुपये चोरुन बिस्किटे व केकची देखिल चोरी केली आहे अशी माहीती दुकान मालक ओंकार तानाजी कडु यांनी दिली आहे. तसेच शिवरे येथील ओमकार मिसळ हाऊसचे देखिल शटर चोरट्यांनी उचकटुन आतील काऊंटर मधील रोख वीस हजार रुपये चोरले असल्याची माहीती मिसळ हाऊसचे मालक धनेश डिंबळे यांनी दिली.
धांगवडी फाटा येथील हाँटेल संकल्प ला लागुन असलेली पानाच्या टपरीचा दरवाजा उचकटुन त्यामधुन आत प्रवेश करुन शेजारील हाँटेल संकल्पचे काचेचे स्लायडींग मधुन आत प्रवेश करुन हाँटेल काउंटर मधील काही रक्कम चोरीस गेल्याचे हाँटेलचे मालक अतुल कामथे यांनी सांगितले. गुरुवारी रात्री व पहाटेच्या सुमारास या चोरीच्या घटना झाल्या आहेत. चोरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिकांच्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.