जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका नवीन रचनेनुसार होणार?; भोर, दौंड, जुन्नर, खेड आणि इंदापूर तालुक्यातील गट व गणांच्या संख्येत वाढ
पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर आता रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वांना लागले आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने वाढीव लोकसंख्या विचारात घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट-गणांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार नव्याने गट-गण रचनादेखील करण्यात आली होती.
परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर ही नव्याने करण्यात आलेली गट-गण रचना रद्द करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा फडणवीस सरकार सत्तेवर आल्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका नवीन गट- गणांनुसार होणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हवेली आणि मुळशी तालुक्यांतील २३ गावे म्हणजे तब्बल अडीच लाखांपेक्षा अधिक ग्रामीण लोकसंख्या महापालिका हद्दीत समाविष्ट झाली आहे. पुणे जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या यामुळे नगर जिल्ह्यापेक्षा कमी झाल्याने पुणे जिल्हा परिषदेच्या गट-गणांची संख्यादेखील कमी झाली होती. नव्या गट रचनेत हवेली तालुक्यातील गट संख्या तब्बल ७ ने कमी झाली होती.
हवेली तालुक्यातील गटांची संख्या महापालिका हद्दीत गेल्याने लोकसंख्या कमी झाली होती. याचवेळी काही तालुक्यातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यांत गट व गणांच्या संख्येत वाढ करण्यात आली होती.
फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने त्यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या रचनेनुसार घेण्याचा निर्णय घेतला तर आपल्या पूर्वीच्या निर्णयानुसार वाढीव लोकसंख्या विचारात घेतली जाऊ शकते. यामुळेच काही तालुक्यात जिल्हा परिषद गट गणांची संख्या कमी होऊ शकते व काही तालुक्यात वाढ होऊ शकते. यापूर्वी तत्कालीन फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या गट गणांची संख्या जिल्ह्यातील गट- गणांचे फेरबदल केले होते.