नवऱ्याने कितीही उत्तम भाषण केलं तरी, नवऱ्याला पार्लमेंटच्या परिसरात अलाउड नसतं, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना जहरी टोला
पुणे : पुण्यातील जाहीर कार्यक्रमामध्ये शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुफान राजकीय बॅटिंग केली आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदार संघासाठी जोरदार लढत होण्याचे चित्र आहे. अजित पवार यांच्याकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार आणि अजित पवार दोघे मतदारसंघ पिंजून काढत असून प्रचार करत आहेत. यावरुन सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या असून त्यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र डागलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘सत्ता कोणाची मक्तेदारी नाही. खाली हात आये थे खाली हात जायेंगे. माझं घर माझ्या खासदारकीवर चालत नाही. कशाला चालायला पाहिजे असे मी माझ्या नवऱ्याला सांगितलं आहे. ‘आमचं लग्न म्हणजे आती क्या खंडाला’ असं आहे अशी तुफान टोलेबाजी त्यांनी केली. तुम्हाला कसा खासदार पाहिजे? सदानंद सुळे चालतील का? सदानंद सुळे यांना पाठवते. ते भाषण करतील. पण, सदानंद सुळे यांनी कितीही उत्तम भाषण केलं तरी पार्लमेंटमध्ये तिथे जाऊन विषय मांडायचे. मलाच लढायचं आहे. माझा नवरा येऊन भाषण करेल ते तुम्हाला चालेल का? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार की मी जाणार आहे. नवऱ्याला पार्लमेंटच्या परिसरात अलाउड नसतं. कॅन्टीनमध्ये बसावं लागतं, असा जहरी टोलाही सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लगावला.
महाराष्ट्रात ३८ खासदार आहेत. त्यातले १० विरोधातले आहेत. तर, ३८ त्यांच्या बाजूचे खासदार आहेत. पण, त्या ३८ पैकी एकाही खासदाराने महागाईचा ‘म’ देखील कधी काढला नाही? संसदेत चुपचाप बसतात. सुप्रिया सुळे आक्रमक भाषण करतात. पण, तुम्ही त्यावर बोलत नाही म्हणूण मी बोलते. गोपीनाथ मुंडे यांचं अख्खं आयुष्य भाजपला वाढवण्यातं गेलं. आज त्यांची मुलगी अडचणीत आहे. आहे का उभा त्यांच्या पाठीमागे पक्ष? विरोधात होते तेव्हाही मुंडे साहेब लढले. पण, आज पंकजाताई बरोबर एक तरी बीजेपीचा माणूस आहे का? भ्रष्ट आरोप केलेले अशोक चव्हाण यांना तुम्ही पद देता. परंतु, ज्या माणसांनी उभं आयुष्य भारतीय जनता पक्षासाठी दिलं त्या गोपीनाथ मुंडे यांच्या मुलींसाठी तुम्हाला वेळ नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केली.