जळत्या चितेवरचा अर्धवट जळालेला मृतदेह काढून फेकला स्मशानभूमीच्या आवारात; भोर तालुक्यातील बालवडी गावातील धक्कादायक प्रकार
भोर : तालुक्यातील बालवडी गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळत्या चितेवरचा मृतदेह बाहेर काढून स्मशानभूमी परिसरात फेकून दिल्याची ही घटना रविवारी(दि. २४ मार्च) सायंकाळी घडली असून या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. प्रकाश सदुभाऊ बढे(रा. नेरे, ता.भोर) यांना याबाबत भोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अक्षय विजय किंद्रे(वय ३० वर्ष, रा.बालवाडी, ता.भोर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालवडी(ता.भोर) ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा किंद्रे यांच्या सासूबाई ताराबाई आनंदा किंद्रे(वय अंदाजे ७० वर्ष) या महिलेचे रविवारी(दि.२४ मार्च) निधन झाले. या गावातील स्मशानभूमीत सदर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री अत्यंविधी उरकून नातेवाईक घरी परतल्यानंतर, नेरे गावातील प्रकाश बढे या व्यक्तीने अक्षरशः वृद्ध महिलेचा मृतदेह जळत असताना बाहेर काढून फेकून दिला आणि जळत असलेली लाकडेही इतरत्र फेकून दिली. स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार करताना बढे यांना बघितल्याने ही घटना उघडकिस आली. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीला मारहाण करत, त्याचे गावात असलेले हॉटेल जाळले आहे. या घटनेनंतर गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. भोर पोलिसांनी हस्तक्षेप करून ही तणाव परिस्थिती नियंत्रणात आणली. या विचित्र घटनेत मृतदेहाच्या झालेल्या हेळसांड मुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.