भरधाव पिकअपची दुचाकीला धडक, टापरेवाडीतील ज्येष्ठाचा मृत्यू; अपघातानंतर चालकाचा सिनेस्टाईल थरार, पुणे-सातारा महामार्गावरील घटना
सारोळा : पुणे-सातारा महामार्गावरील निरा नदीच्या पुलाजवळ सारोळा (ता. भोर) गावच्या हद्दीत सोमवारी (दि. १९ मे) रात्री विचित्र अपघात घडला. यात भरधाव पिकअप ने दुचाकीला दिलेल्या धडकेत ५७ वर्षीय दुचाकीस्वार ज्येष्ठाचा जागीच मृत्यू झाला. विजय जयसिंग टापरे (रा. टापरेवाडी, ता. भोर) असे अपघातात मृत्यू झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विजय टापरे हे सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून (एम.एच. १२ टी.बी. ३४६३) शिरवळ (ता. खंडाळा) बाजूने सारोळ्याच्या दिशेला येत होते. यादरम्यान त्यांनी निरा नदीचा पुल ओलांडला असता अचानक मागून येणाऱ्या भरधाव पिकअपने (एम.एच. १२ व्ही.टी. 9622) त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये विजय टापरे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर पिकअप चालकाचा सिनेस्टाइल थरार…
यानंतर घटनास्थळी न थांबता चालकाने पिकअप सहित तेथून धूम ठोकली. यावेळी तिथे पोहोचलेल्या सारोळा गावातील तरुणांनी त्याचा पाठलाग करत चालकाला पिकअप थांबवण्यासाठी सांगितले. परंतु निर्दयी चालकाने त्यांच्याही अंगावर पिकअप घालण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा मागे न हटता अखेर सिनेस्टाईल पद्धतीने भास्कर धाडवे, बंटी धाडवे, मिथुन दळवी, शुभम दळवी, रोहन धाडवे, अजिंक्य धाडवे, शुभम शेरे या तरुणांनी पिकअप चालकाला पकडुन राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले.
यांनतर राजगड पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेह भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेची फिर्याद सनि विजय टापरे (वय २३ वर्ष, रा. टापरेवाडी ता.भोर) यांनी दिली. दाखल फिर्यादीनुसार भरधाव वेगाने वाहन चालवून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पिकअप चालक रामराज ग्यानबा गायकवाड (वय ३४ वर्ष, सध्या रा. वडकी नाला, ता. हवेली, मुळ रा. आताळा, ता. परंडा, जि धाराशिव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार मयूर निंबाळकर करीत आहेत.