पहिले ‘निसर्ग कवी संमेलन’ निसर्गाच्या सानिध्यात ‘बनेश्वर कृषी पर्यटन’ येथे संपन्न
नसरापूर :- काव्ययोग काव्य संस्था, पुणे यांच्यावतीने आयोजित केलेले पुण्यापासून बाहेर निसर्गात पहिले “निसर्ग कवी संमेलन” बनेश्वर तीर्थस्थानी, बनेश्वर कृषी पर्यटन(नसरापूर, ता.भोर) येथे आज रविवारी(दि. २५ फेब्रुवारी) आनंदाच्या वातावरणात निसर्ग कवी लक्ष्मण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या कवीसंमेलास कवींचा भरपूर प्रतिसाद मिळाला.
या कवी संमेलनासाठी बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर या ठिकाणीवरुन ७० कवींची लक्षणीय उपस्थिती होती. या संमेलनाला उद्घाटक म्हणून ॲड. विजयकुमार कस्तुरे, तसेच विशेष उपस्थिती म्हणून संगीता गुरव, प्रमुख उपस्थिती म्हणून लेखिका प्रतिमा काळे, कवी दशरथ धायगुडे, कवी धनंजय इंगळे आदी उपस्थित होते.
काव्य योग काव्य संस्था पुणेचे अध्यक्ष योगेश हरने यांनी या कवी संमेलनाचे आयोजन केले होते. गौरव पुंडे, शैलेश सुतार, श्रीराम घडे, प्रमोद सूर्यवंशी या तरुण साहित्यिकांनी हे कवी संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक किरणजी केंद्रे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “किशोर मासिक हे लहान मुलांसाठी प्रेरणादायी असून या मासिकात कविता ह्या फक्त लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रकाशित केले जाते. लहान मुलांच्या प्रेरणादायी असतील अशाच कविता किशोर मासिकांमधून प्रकाशित केल्या जातात किशोर मासिकासाठी येणाऱ्या अनेक कवितांमधून निवडक कविता किशोर मासिका मध्ये प्रकाशित करण्याचा आमचा मानस असतो.”
पुढे भाषण करताना निसर्ग कवी लक्ष्मण शिंदे, यांनी सांगितले की, “कवीसंमेलनेही शहरात न होता निसर्गरम्य ठिकाणी, निसर्गाच्या सानिध्यात अशी कवी संमेलन आयोजित केली जावी. त्यामुळे ग्रामीण भागाचा ढंग, ग्रामीण भागातील कविता, ग्रामीण भागातील जनजीवन कवींना समजून यावे आणि ग्रामीण भागातील लोकांना कवितेचा लळा लागावा यासाठी निसर्गातच कवी संमेलन व्हावे याकरिता माझा कायम प्रयत्न राहील.”
या कवी संमेलनात संपादक योगेश हरणे यांचे “सुखाची सावली” या प्रतिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. हे पहिलेच निसर्ग कवी संमेलन असल्यामुळे, ते यशस्वी झाल्याचा आनंद आयोजक, नियोजक आणि उपस्थित असलेल्या कवींच्या भावनांमधून दिसून येत होता. या कवी संमेलनासाठी बनेश्वर कृषी प्रदर्शन चे मालक कृष्णाजी फडतरे यांनी हॉल व इतर साहित्य मोफत दिलेले होते.