मुळशी येथे २० वर्षीय तरुणाचा खून
मुळशी : मणिपूर येथील लंगपोकलाकपम लमंगनबा सिंग(वय २०) हा त्याची बहीण आम्रबाती (वय २७) हिच्या सोबत सुस येथे राहत होता.सिंग आणि त्याची बहीण मणिपूरमधील पूर्व इम्फाळचे आहेत. त्याची बहीण पुण्यात मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. तर सिंग हा स्पोकन इंग्लिश कोर्स करत होता. सिंग हा महिन्याभरापूर्वी पुण्यात आला होता.गुरुवारी संध्याकाळी तो बहिणीच्या घरातून निघून गेला आणि रात्री उशिरापर्यंत परत आला नाही. त्यानंतर त्याच्या बहिणीने त्याचा शोध सुरू केला. शोधाशोध करुनही त्याचा काहीच पत्ता न लागल्याने याप्रकरणी त्याची बहीण आम्रबाती (वय 27) हिने पोलिसांत फिर्याद दिली. पौड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी चांदे गावातील नागरिकांना सिंग हा रस्त्याच्या कडेला एका मोकळ्या जागेत बेशुद्धावस्थेत सापडला.पोलीस निरीक्षकांनी लगेचच घटनास्थळी एक टीम पाठवली आणि त्याला जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.अज्ञात कारणावरून सिंग यांच्या डोक्यावर वार करण्यात आले आहेत. घटनास्थळाजवळ त्याची खराब झालेली स्कूटरही पोलिसांना सापडली. हा सर्व प्रकार मुळशी तालुक्यातील चांदे रस्त्यावरील मुलखेड गावात झाल्याचे आढळून आले. या हत्येमागील हेतू अद्याप कळू शकलेला नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून तो त्याच्या स्कूटरवर एकटाच जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पौड पोलिस करत आहेत.