भोर तालुक्यातील ससेवाडी येथील गुरुदत्त सी.एन.सी. कंपनीतून सुमारे दोन लाख छत्तीस हजार रुपये किंमतीच्या मालाची चोरी
खेड शिवापूर : भोर तालुक्यातील ससेवाडी येथील गुरुदत्त सी.एन.सी. कंपनी मधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २ लाख ३६ हजार १९० रुपये किंमतीच्या मालाची चोरी केल्याची घटना घडली आहे. याबाबत प्रविण चंद्रकांत जगताप(वय ४८ वर्षे, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी आज शुक्रवारी(दि. १९ जुलै) सायंकाळी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससेवाडी(ता.भोर) गावच्या हद्दीत गट क्रमांक २९ मध्ये १२ गुंठे क्षेत्रात गुरुदत्त सी.एन.सी. ही कंपनी आहे. दि. १६ जुलै रोजी रात्री उशिरा काही अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या स्टोअर रूमच्या दक्षिण बाजुचे खिडकीचे ग्रील कापून स्टोअर रूम मध्ये प्रवेश केला. आणि त्यावेळी स्टोअर रूम मध्ये असणाऱ्या तब्बल २ लाख ३६ हजार १९० रुपये किंमतीच्या मालाची चोरी केली. त्यामध्ये विविध रंगाच्या केबल सामाविष्ट होत्या. या चोरीच्या घटने बाबत प्रवीण जगताप यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार गायकवाड करीत आहेत.