मुळशीतील भोंदूबाबाचा सायबर कट उघड! मोबाईल हॅक करून करत होता भक्तांचे खाजगी चित्रीकरण
मुळशी : अंधश्रद्धेच्या नावाखाली श्रद्धाळू भक्तांची फसवणूक करणाऱ्या मुळशी तालुक्यातील एका भोंदूबाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार (वय २९, रा. सुसगाव, ता. मुळशी) असे या अटक केलेल्या बाबाचे नाव असून, त्याने एका हिडन अॅपच्या साहाय्याने भक्तांच्या खाजगी हालचाली रेकॉर्ड करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
मृत्यूची भीती दाखवून मानसिक फसवणूक…
बाबा स्वतःला “दिव्यशक्ती प्राप्त” असल्याचे सांगत होता. तो भक्तांना “तुमचा मृत्यू ४-५ महिन्यांत निश्चित आहे” असे सांगून मानसिकदृष्ट्या दुर्बल करत असे. अशा भीतीच्या पार्श्वभूमीवर तो त्यांच्याकडून स्वतःचा मोबाईल घेत, ‘मंत्र जाप’ करण्याच्या बहाण्याने, पासवर्ड मागून मोबाईलमध्ये ‘एअर ड्रॉइड कीड’ हे लपवलेले अॅप डाउनलोड करत असे.
मोबाईलवरून थेट नियंत्रण...
हे अॅप बॅकग्राऊंड मध्ये राहून बाबाला संबंधित व्यक्तीचा कॅमेरा, आवाज, लोकेशन यावर थेट नियंत्रण मिळवून देत होते. बाबा भक्तांना फोन करून त्यांच्या पोशाखाबाबत, दिवसभरातील हालचालींबाबत अचूक माहिती सांगून त्यांचा विश्वास संपादन करत असे.
अनैतिक सल्ला आणि चित्रीकरण…
मृत्यूपासून बचाव करण्यासाठी बाबा तरुण भक्तांना “प्रेयसी किंवा वेश्या असलेल्या महिलेबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करा” असा सल्ला देत असे. विशेष म्हणजे अशा संबंधांच्या वेळी मोबाईलचा नेव्हिगेशन मोड सुरू ठेवून तो विशिष्ट ठिकाणी ठेवण्यास सांगत असे. त्यामुळे बाबा त्यांच्या खाजगी क्षणांचे चित्रीकरण करत होता.
सायबर तज्ज्ञ मित्रामुळे या गंभीर घटनेचा उलगडा…
एका भक्ताचा मोबाईल सतत गरम होऊ लागल्यामुळे त्याने तो आपल्या सायबर तज्ज्ञ मित्राकडे तपासणीसाठी दिला. तपासणीत हिडन अॅप सापडले आणि मोबाईल बाहेरून ऑपरेट होत असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित भक्ताला मोबाईल केवळ बाबालाच दिल्याचे आठवताच त्याने इतर भक्तांशी संपर्क साधला. यावेळी त्यांच्या मोबाईलमध्येही तेच अॅप आढळले.
पोलिसांकडून तातडीची कारवाई…
या सर्व भक्तांनी एकत्र येऊन बाबाला जाब विचारल्यावर तो घाबरला आणि तक्रार न करण्याची विनंती करू लागला. मात्र, एका तरुण भक्ताने डायल ११२ वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बाबाला ताब्यात घेतले. शुक्रवारी (२८ जून) रात्री बावधन पोलिस ठाण्यात अनेक भक्तांनी गर्दी करत, आपल्यावरही अशीच फसवणूक झाल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल आणि अॅप्स तपासले असता आरोपात तथ्य आढळले.
गुन्हा दाखल, डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू…
बाबावर आयटी अॅक्ट व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रीकरण कुठे साठवले जात होते, याचा शोध घेण्यासाठी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू आहे.
“अशा प्रकारच्या बाबांपासून सावध राहावे. कोणतीही अंधश्रद्धा ठेवू नये आणि आपली गोपनीय माहिती किंवा मोबाईल कोणालाही देऊ नये. तसेच, बाबाने फसवणूक केली असल्यास घाबरून न जाता समोर येऊन तक्रार द्या.”
– अनिल विभूते, वरिष्ठ निरीक्षक, बावधन पोलिस ठाणे.