महाविकास आघाडीच्या सभेत संग्राम थोपटेंनी सुप्रियाताईंसाठी थोपटले दंड; संजय राऊत, थोरात व शरद पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल
कापूरहोळ : भोर, वेल्हे तालुक्यातील शेतकरी, व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा शनिवार(दि. ९ मार्च) रोजी पुणे-सातारा महामार्गालगत हरिश्चंद्री(ता.भोर) येथील प्रांगणात पार पडला. भोर-वेल्हे तालुक्यातील जनतेच्या मनात या सभेबाबत प्रचंड उत्सुकता होती. या मेळाव्याला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, उ.बा.ठा. शिवसेनेचे नेते संजय राऊत आदी नेते उपस्थित होते.
या मेळाव्याच्या सुरुवातीस उ.बा.ठा. शिवसेना जिल्हा संघटक कुलदीप कोंडे बोलताना म्हणाले की, समोर बसलेली जनता निष्ठावान आहे, बाप बदलणारी नाही. जनतेला आवाहन करत ते म्हणाले की, या वेळेस च्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांना आपल्याला खासदार म्हणून निवडून द्यायचे आहे. पुढे आमदार संग्राम थोपटे बोलताना म्हणाले की, हा विजयी मेळावा आहे. भोर वेल्ह्याच्या मावळ्यांनी एकदा ठरवलं तर त्या गोष्टी असाध्य होत नसतात. ज्या ज्या वेळी स्वराज्यावर परकीय अतिक्रमणे झाली, त्या त्या वेळी एक वज्रमुठ करून ते परतवण्याचे काम या भूमीने केले आहे. पुढे विरोधकांवर निशाणा साधत संग्राम थोपटे शरद पवारांना संबोधित करून बोलले की, ज्या ज्या मंडळींना तुमच्या काळात तुम्ही लाभाची पदे दिली. या तालुक्यामध्ये ज्यांनी ज्यांनी तुमचे नाव घेऊन राजकारण केले. ती मंडळी तर आम्हाला विरोध करत होतीच, तुम्हाला सुद्धा दुर्दैवाने विरोध करत आहेत. त्या मंडळींचा खऱ्या अर्थाने बंदोबस्त करण्याची वेळ या निमित्ताने आलेली आहे. पुढे जनतेला आवाहन करत ते म्हणाले की, आपल्याला तुतारी वाजवण्याऱ्या माणसापुढे बटन दाबून चौथ्यांदा लोकसभेमध्ये ताईंना पाठवायचं आहे.
यानंतर बोलताना सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीत तीन वेळा मोठ्या मतधिक्यान निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. पुढे त्या म्हणाल्या की, माझी राज्यात कोणाशी लढाई नाही, ही लढाई दिल्लीच्या तक्ताशी आणि अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे. महाराष्ट्राचा विरोध आणि द्वेष करण्यासाठी केंद्र सरकार आज आपल्या मागे लागले आहे. अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. पुढे त्या म्हणाल्या की, दमदाटीला घाबरु नका, कोणी जनतेला दमदाटी करत असेल तर सुप्रिया सुळेशी गाठ आहे. माझ्या बारामती मतदासंघांत दमदाटी कधीच खपवून घेणार नाही, असा थेट इशाराही सुप्रिया सुळेंनी यावेळी विरोधकांना दिला.
सभेत पुढे बोलताना उ.बा.ठा. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधत कविता सादर केली त्यात ते म्हणाले की, “नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला, त्याच्याकडून जमेना म्हणून बारामतीचा बघितला, तो पुरे ना म्हणून नांदेडवाल्याचा हात धरला, बघू आता तरी कमळाबाईच्या पोटी विकास पैदा होता का?” पुढे बोलताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली, ‘”या सरकारने, मोदीने गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या जणांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे, पण मला एक स्पेशल भारतरत्न मोदींना द्यायचा आहे. त्यासाठी मी शरद पवारांची परवानगी घेईन. इतक्या जलद गतीने फेकाफेक करणारा माणूस या जगात दुसरा जन्माला आला नाही. तो भारतात जन्माला आला, तो भारतीय जनता पक्षात जन्माला आला. या लोकांना कसंकाय सूचतं? कुठे ट्रेनिंग मिळते? यांची कुठे कार्यशाळा आहे?’, असा सवाल संजय राऊतांनी यावेळी केला.
यानंतर पुढे बोलताना, येणारी लोकसभेची निवडणूक देशाचे भविष्य व भवितव्य मजबूत करण्यासाठी महत्वाची आहे. स्वातंत्र्यानंतर पंडीत नेहरू ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत अनेक पंतप्रधान देशाने पाहीले. त्याकाळात देशात चिंता नव्हती. मात्र गेल्या दहा वर्षात चिंता पाहायला मिळत आहे. आता वेळ परीवर्तनाची, बदल करण्याची आली आहे. परीवर्तनाशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच लोकसभेला सुप्रिया सुळेंना मोठया मताधिक्याने निवडून दया असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले. पुढे आमदार संग्राम थोपटेंना संबोधताने ते म्हणाले की, आज मी जनतेच्या साक्षीने सांगतो की, तुम्ही जे काही तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी कराल त्यासाठी तुमच्या पाठीशी शरद पवार कायम राहील. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या रस्त्यांना असो अथवा नसो, परंतु इथून पुढं एकदा शरद पवारांचा पाठिंबा असल्याच्या नंतर विकासाच्या संदर्भात राजकारणात काय परिवर्तन होऊ शकते हे मी दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास भोर तालुक्यातील जनतेला करतो, असे वक्तव्य शरद पवारांनी सभेच्या शेवटी केले. या मेळाव्याचे प्रास्ताविक मानसिंगबाबा धुमाळ यांनी केले, तर संपूर्ण सभेचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.