राजगड गळीत हंगाम बंद असला तरी कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही, ती आमची जबाबदारी – आमदार संग्राम थोपटे
कापूरहोळ : राजगड सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम सन २०२३-२४ मध्ये बंद ठेवला असला, तरी कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार असून कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही, ती आमची जबाबदारी असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी कामगार संघटना व संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत सांगितले. राजगड कामगार युनियन व संचालक मंडळामध्ये गळीत हंगाम २०२३-२४ सुरू करण्या करिता चर्चा झाली असून संचालक मंडळाने केलेल्या प्रयत्नाबाबतची माहिती कामगार युनियन यांना देण्यात आली. गळीत हंगाम सुरू करण्याकरिता संचालक मंडळ यांनी कारखाना मशिनरीची दुरुस्ती केली. परंतु, काही ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा आगाऊ रक्कम घेऊनही न आल्याने, तसेच बाहेरची जादाची ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा न मिळाल्याने गळीत हंगाम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्य शासनाचे थकहमीचे कर्ज न मिळाल्याने वेळेत ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा भरता आली नाही. इतर वित्तीय संस्थांनी कर्ज देण्यास पाठ फिरवली. परिणामी गळीत हंगाम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या विषयावर कामगार युनियन प्रतिनिधी व संचालक मंडळ यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यामध्ये राजगड कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना तत्काळ एक पगार देण्याची चर्चा केल्याचे आमदार थोपटेंनी सांगितले.
या वेळी कामगार युनियनचे अध्यक्ष रामचंद्र राजेशिर्के यांनी कामगारांचे प्रश्न संचालक मंडळापुढे पुढे मांडले. त्यामध्ये कामगारांचे पगार, प्रॉव्हिडंड फंड, ग्रॅच्युईटी व इतर विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये संचालक मंडळाने कामगारांच्या देय रकमेबाबत लवकरात लवकर मार्ग काढणार असल्याचे सांगितले.
यावेळी व्हा. चेअरमन पोपटराव सुके, संचालक उत्तमराव थोपटे, विकास कोंडे, सुभाष कोंढाळकर, सुधीर खोपडे, अरविंद सोंडकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. आर. पाटील व कामगार युनियनचे अध्यक्ष सुधीर राजेशिर्के, उपाध्यक्ष सुनील बाठे, दत्तात्रय गावडे, ज्ञानेश्वर कडू, सूर्यकांत गरूड, जयसिंग मळेकर, भीमराव चव्हाण आदी उपस्थित होते.