साताऱ्यात अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वाभिमान दिवस उत्साहात साजरा; छत्रपती शाहू महाराजांच्या राजसदरेला सातारकरांचा मुजरा
सातारा(प्रतिनिधी) : सकाळच्या थंड हवेमध्ये ढोल ताशांच्या गजरात शिवभक्तांनी अजिंक्यतारा किल्ल्यावरील छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजसदरेला वंदन करून सदैव जय भवानी जय शिवाजी चा जयघोष करत स्वाभिमान दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा केला. शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला शाहू महाराजांच्या पालखीला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी खांदा दिला. यावेळी शाहू महाराजांच्या पालखीची जय्यत मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली होती.
छत्रपती शाहू महाराजांनी १२ जानेवारी १७०८ रोजी येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला होता. तो दिवस शिवराज्याभिषेकदिन उत्सव समितीच्या वतीने सातारा स्वाभिमान दिवस म्हणून साजरा केला जातो. या उपक्रमाचे यंदा बारावे वर्ष होते. छत्रपती शाहू महाराजांची पालखीअजिंक्यतारा किल्ल्यावरील महाद्वारापासून रत्नेश्वर मंदिर मंगळाई मंदिर येथून थेट राजसदरेवर आणण्यात आली. गडावरील देवतांचे दर्शन घेऊन त्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. या पालखीला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वतः खांदा दिला.
शाहू महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास निलेश झोरे आणि संदीप महिंद यांनी उलगडला. २०३२ पर्यंत शाहू महाराजांची पालखी चांदीची करण्याचा संकल्प शिवराज्याभिषेक उत्सव समितीने केला आहे. हा संकल्प निश्चित पूर्ण करू, असा निर्धार समितीचे संस्थापक दीपक प्रभावळकर यांनी व्यक्त केला आहे. शिव अभ्यासक शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीचे अजय जाधवराव यांनी सांगितले की, शाहू महाराजांचा इतिहास तेजस्वी असूनही अद्याप दुर्लक्षित आहे. त्यातही दैदीप्यमान इतिहासाचे पुढील पिढीला स्मरण होण्यासाठीच उत्सव समितीचा हा उपक्रम सुरू असल्याचे अजय जाधवराव यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे, कन्हैयालाल राजपुरोहित, संतोष शेडगे, दत्ताजी भोसले, शिव अभ्यासक संदीप महिंद, नगरसेवक शेखर मोरे पाटील, संग्राम बर्गे, शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीचे दीपक प्रभावळकर, सुदाम गायकवाड, निलेश झोरे, सचिन जगताप, ॲड. विनीत पाटील युवा करिअर ॲकॅडमी विश्वास मोरे, एलबीएस कॉलेजचे महेश गायकवाड, ॲड. अरविंद कदम, मंगेश काशीद, रवी पवार, प्रकाश घुले, गणेश दुबळे इत्यादी उपस्थित होते.