डीपीचा शॉक बसून बैल जागीच ठार, शेतकरी जखमी: महावितरणच्या निष्काळजीपणावर ग्रामस्थ संतप्त; राजगड तालुक्यातील घटना

मुख्य संपादक दिपक महांगरे.

राजगड : राजगड (वेल्हे) तालुक्यातील हिरपोडी गावात बुधवारी (दि. २ जुलै) सायंकाळी पाचच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक विद्युत अपघात घडला. शेतकरी रामचंद्र मारुती कोडीतकर हे आपल्या शेतातून औत व बैलांसह घरी परतत असताना, गावातील एका विद्युत वितरण पेटीच्या (डीपी) जवळून जाताना त्यांच्या बैलांना जोरदार शॉक बसला. या हृदयद्रावक घटनेत एक बैल जागीच मृत्युमुखी पडला, तर दुसरा बैल आणि शेतकरी रामचंद्र कोडीतकर स्वतः जखमी झाले. हे दृश्य पाहून संपूर्ण गावात हळहळ आणि संतापाची लाट उसळली आहे.

ही दुर्घटना काही क्षणातच घडली. एक क्षण बैल शांतपणे चालत होते, आणि दुसऱ्या क्षणी त्या डीपीने दोन्ही बैलांना औतासकट जोरात ओढले. विजेच्या धक्क्याने एक बैल जागीच कोसळला, आणि दुसरा तडफडत बाजूला गेला. कोडीतकर स्वतःही जमिनीवर फेकले गेले. सुदैवाने काही ग्रामस्थांनी वेळीच धाव घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचला.

ग्रामस्थांचा संताप; महावितरणवर थेट आरोप…
गावकऱ्यांच्या मते, हा डीपी काही वर्षांपूर्वी बसवण्यात आला होता. मात्र, त्यामध्ये सुरक्षेचे कोणतेही योग्य उपाय, तांत्रिक तपासणी किंवा खबरदारीचे संकेत नव्हते. “महावितरणच्या निष्काळजीपणाचा हा थेट परिणाम आहे. हे दुर्लक्ष नव्हे, तर थेट जीव घेणारी बेपर्वाई आहे,” असा थेट आरोप माजी सरपंच विठ्ठल कोडीतकर यांनी केला.

Advertisement

प्रशासनाच्या सूचनाही हवेतच राहिल्या…
केवळ काहीच दिवसांपूर्वी भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना आपत्कालीन व्यवस्थापन, देखभाल आणि सतर्कतेबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र महावितरणच्या अधिकार्‍यांनी या सूचनांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे या दुर्घटनेतून स्पष्ट होते. अशा हलगर्जीपणामुळे एका बळीराजाचा जीव धोक्यात आला, आणि एक बिनबोल प्राणी मृत्युमुखी पडला.

दोषींवर कठोर कारवाई आणि नुकसानभरपाईची ग्रामस्थांची मागणी…
या घटनेने गावकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आहे. संतप्त ग्रामस्थांनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, जखमी शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि बैलाच्या नुकसानीस भरपाई मिळावी, अशी ठाम भूमिका घेतली आहे. “आज बैल गेला, उद्या माणूसही जाऊ शकतो,” गावकऱ्यांच्या या चिंतायुक्त वाक्याने संपूर्ण घटनेची भीषणता अधोरेखित होते.

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. “जर संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरीत कारवाई झाली नाही, तर ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल,” असा इशारा मा. सरपंच विठ्ठल कोडीतकर, उपसरपंच सागर कोडीतकर, नवनाथ कोडीतकर, दिपक कोडीतकर, रामभाऊ राजीवडे, रामभाऊ डांगे आणि दत्ता रेणुसे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page