भीषण आग: चिखलगाव-धोंडेवाडीत संपूर्ण घरसंसार जळून खाक, ७ लाखांचे नुकसान
भोर : तालुक्याच्या पश्चिमेकडील चाळीसगाव खोऱ्यातील चिखलगाव-धोंडेवाडी येथे बुधवारी (दि. 2 जुलै) रोजी संध्याकाळच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत हरूबाई राजाराम आंबवले यांचे संपूर्ण घर आणि संसार जळून खाक झाला. या दुर्घटनेत सुमारे सात लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
भर पावसात जोरदार वाऱ्याच्या झंझावातात शॉर्टसर्किटमुळे काही क्षणांतच घराला आग लागली. आग इतकी प्रचंड होती की संपूर्ण घर आगीच्या लाटांमध्ये आढळले. घरातून बाहेर येणारे जळत्या वस्तूंचे लोळ व धुराचे ज्वालामुखीप्रमाणे दृश्य भयावह होते. जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवरही आग वेगाने पसरली आणि संपूर्ण घरसंसार भस्मसात झाला.
घटनेची माहिती मिळताच भोर नगरपरिषदेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक आण्णा पवार, अग्निशमन दल व ग्रामस्थांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात आली. दरम्यान, घरात ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा मोठा स्फोटही झाला, मात्र सुदैवाने घरात कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली.
या आगीत घरातील धान्य, कपडे, भांडी, जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य पूर्णतः जळून गेले. आपत्ती नंतर रवी सोहम दत्त फाउंडेशन, हिंदू एकता आंदोलन संस्था व सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू फोर्स यांच्या वतीने कुटुंबास आठवड्याचे रेशन व भाजीपाला देण्यात आला. तरीही प्रशासनाकडून अजूनही अधिकृत मदतीची अपेक्षा असून, गावकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ पंचनाम करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.