भोर – भेलकेवाडीतील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या विठ्ठल मंदिरात काकड आरतीची १०९ वर्षांची अखंड परंपरा
भोर : भोर शहरातील भेलकेवाडी येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात १०९ वर्षांची परंपरा असलेल्या काकड आरतीची परंपरा सुरु आहे. येथील महिला भगिनी भल्या पहाटे मंदिर परिसरात सडा टाकून काकड आरतीला सुरवात करतात. दिपावलीचे औचित्य साधून या काकड आरतीत महिलांनी मंदिरात श्री विठ्ठलाची आकर्षित रांगोळी काढून फुलांची सजावट केली होती. पहाटे पासून काकडातील भजन म्हणून शेवटी आरती करण्यात आली. दरम्यान विठ्ठल रुक्मिणीच्या मुर्तींना सजवून नैवद्य दाखवण्यात आला. आरतीनंतर जमलेल्या भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भेलकेवाडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्थापना १९१५ साली झाली असून १०९ वर्षाची काकड आरतीची अखंडीत परंपरा सुरु आहे. कोजागिरी पौर्णिमेपासून सुरवात झाली आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला होम हवन व महाप्रसादाने काकडाची समाप्ती होणार आहे. श्री विठ्ठल मंदिर मंडळामध्ये वर्षभर संप्रदायिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु असते. यात ६० वर्षांची परंपरा असलेला अखंड हरिणाम सप्ताह, शिवजयंती उत्सव आणि पारंपरिक गणेशोत्सव आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. भेलकेवाडी विठ्ठल मंदिराची प्रति पंढरपूर नावाने ओळख आहे. आषाढी एकादशीला असंख्य भाविक या ठिकाणी पांडुरंगचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. नवसाला पावणारा पांडुरंग अशी विठ्ठल मंदिर भेलकेवाडीची ओळख आहे. प्रत्येक एकादशीला मंदिरात रात्री भजन होते. विविध प्रकारच्या संप्रदायिक कार्यक्रमामुळे भेलकेवाडी मधील वातावरण पूर्ण वर्षभर भक्तिमय असते.