गावात दहशत माजविणाऱ्या हडपसर परिसरातील टोळीला भिवडीकरांनी दिले त्यांच्या स्टाईल मध्ये उत्तर; धु धु धुवून सासवड पोलिसांच्या दिले ताब्यात
पुरंदर : हडपसर परिसरातील एका टोळीने भिवडी गावातील उमाजी नाईक स्मारकासमोरील नारायणपुर रस्त्यावर गुरुवारी (दि. ११ जुलै) रात्री दहाच्या सुमारास मोटार सायकलची रेस करून, मोठमोठ्याने कर्णकर्कश आवाज करीत गाडयांच्या सायलन्सर मधुन फटाक्यासारखा आवाज काढत, हातात लांबलचक कोयता घेवून चालू गाडीवरून रस्त्यावरून जाळ काढत दहशत मजवण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या वेळी हा प्रकार पाहून सुरुवातील परिसरातील नागरिक भयभीत झाले. मात्र काही वेळातच ग्रामस्थ एकत्र जमले आणि भिवडीकरांच्या स्टाईल मध्ये चांगलेच धु धु धुवून या टोळीची मस्ती उतवरली.
याबाबत सासवड पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी सर्व आरोपींना पोलिसांच्या हवाली केले. याबाबत भिवडी गावचे पोलीस पाटील अक्षय शिंदे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आकाश अशोक नागरगोजे (वय २१, रा. ढोलेवस्ती, उरुळी देवाची), सुनिल किशोर लाटे (वय २२, रा. दत्तनगर, वडकी) प्रबुद्ध राजकुमार सावळे (वय १९ रा. १० वा मैल, वडकी. ता. हवेली), यांच्यासह चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून पाच दुचाकी आणि लोखंडी कोयता असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लडकत पुढील तपास करीत आहेत.